Join us
Daily Top 2Weekly Top 5

मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित

फ्लोरिडातील मियामी शहरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि येथे पूर आणीबाणी जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 16:41 IST

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंका विरुद्ध नेपाळ यांच्यातला ११ जूनचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला, जो फ्लोरिडा येथे होणार आहे. अशीच परिस्थिती अमेरिका विरुद्ध आयर्लंड ( १४ जून), भारत विरुद्ध कॅनडा ( १५ जून) आणि पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड ( १६ जून) यांच्या सामन्यात पाहायला मिळण्याची शक्यता बळावली आहे. फ्लोरिडातील मियामी शहरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि येथे पूर आणीबाणी जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे.  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अ गटातील उर्वरित सामने फ्लोरिडाच्या लौडेरहिल येथे होणार आहेत. हे शहर मियामीपासून ३० माईल्स अंतरावर आहे आणि त्यामुळे या पूर परिस्थितीचा फटका येथेही बसणे साहजिक आहे. १४ जूनला होणाऱ्या आयर्लंड विरुद्ध अमेरिका या सामन्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता १०० टक्के वर्तवली जात आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहे.  १५ जूनला भारत-कॅनडा यांच्या लढतीत हीच शक्यता ८६ टक्के आहे आणि त्यामुळे हाही सामना रद्द होण्याचा अंदाज आहे. पण, भारताचे आधीच सुपर ८ मध्ये जागा पक्की केली असल्याने आणि कॅनडाला काही केल्या संधी नसल्याने, हा सामना तितका महत्त्वाचा नाही. मात्र, १६ जूनचा सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला खूप मोठा फटका बसू शकतो. या सामन्यात पाऊस पडण्याचा अंदाज ८० टक्के आहे.  

पावसामुळे हे तिन्ही सामने रद्द झाल्यास भारत आणि अमेरिका हे संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करतील.. बाबर आजमच्या पाकिस्तान संघाचे पॅकअप होऊन जाईल. अमेरिका-आयर्लंड हा सामना रद्द झाल्यास, अमेरिकेचे ५ गुण होतील आणि पाकिस्तानचे पॅक अप होईल. मग जरी पाकिस्तानने शेवटच्या लढतीत आयर्लंडवर विजय मिळवला तरी त्यांना ४ गुणांवर समाधानी रहावे लागेल.  

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024ऑफ द फिल्ड