T20 World Cup 2024 IND vs AUS Live Marathi : रोहित शर्माने ( Rohit Sharma) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 8 मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गाजवला. त्याने मिचेल स्टार्कच्या षटकात कुटलेल्या २९ धावा ऑसींच्या मनात धडकी भरवणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मैदानावर फक्त रोहितचा जलवा दिसला आणि त्याने ४१ चेंडूंत ९२ धावांची स्फोटक खेळी केली. हिटमॅनचे शतक हुकल्याची खंत चाहत्यांमध्ये दिसली. रोहितने उभ्या केलेल्या मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी धावांचे इमले रचले आणि ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य उभे केले.
१५ चेंडूंत ७६ धावा! Rohit Sharma चा जलवा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये मोडले अनेक विक्रम
वन डे वर्ल्ड कप फायनलचा सर्व राग रोहित ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर काढला. विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितने अचानक गिअर बदलला आणि मिचेल स्टार्कच्या एका षटकात २९ धावा कुटल्या. हिटमॅनची फटकेबाजी पाहून ऑसी गोलंदाज हैराण झाले आणि त्यांचे सर्व डावपेच भारतीय कर्णधाराने नेस्तनाबुत केले. रोहितने १९ चेंडूंत वेगवान अर्धशतक पूर्ण केले आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी नोंदवली. रोहित व रिषभ पंत ( १५) यांनी ३८ चेंडूंतील ८७ धावांची भागीदारी केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहितने २०१० मध्ये रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ७९ धावा करून त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती.
ज्या स्टार्कला रोहितने धुतले होते, त्यानेच हिटमॅनची विकेट घेतली. रोहित ४१ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह ९२ धावांवर त्रिफळाचीत झाला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील ही भारताकडून दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सुरेश रैनाने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०१ धावा कुटल्या होत्या. रोहित व सूर्यकुमार यादव यांनी २० चेंडूंत ३४ धावा केल्या. शिवम दुबे व सूर्या यांच्यावर ही धावगती वाढवण्याची जबाबदारी होती आणि त्यांनी ती पार पाडलीही. या दोघांची १९ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी स्टार्कने तोडली. सूर्या १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांवर झेलबाद झाला. पहिल्या २ षटकांत ३४ धावा देणाऱ्या स्टार्कने त्याची स्पेल ४-०-४५-२ अशी संपवली. जॉश हेझलवूडनेही ४-०-१४-१ अशी अप्रतिम स्पेल टाकली.
मिचेल मार्शने ४ धावांवर हार्दिक पांड्याचा सोपा झेल टाकला. १५ षटकांत भारताच्या ४ बाद १६२ धावा होत्या आणि शेवटच्या ५ षटकांत हार्दिक व शिवम यांनी अपेक्षित फटकेबाजी केली. शिवम २२ चेंडूंत २८ धावांवर झेलबाद झाला. हार्दिकने १७ चेंडूंत २७ धावा चोपल्या आणि भारताला ५ बाद २०५ धावा केल्या. भारताला शेवटच्या ५ षटकांत ४३ धावा केल्या.