Join us

IND vs PAK सामन्याचे एक तिकीट १६ लाख ६४,७३३ रुपये! ललित मोदीने ICC ला फटकारले

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ९ जून रोजी न्यू यॉर्कमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 19:54 IST

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ९ जून रोजी न्यू यॉर्कमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी जवळपास पूर्ण तयारी करण्यात आली आहे. क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या स्पर्धेतील हा महत्त्वाचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सामन्याची क्रिकेट जगतात खूप चर्चा होत असली तरी सध्या या सामन्याच्या तिकिटांच्या किमतींवरून गदारोळ सुरू आहे. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी महागड्या तिकिटांसाठी आयसीसीला फटकारले आहे. आयसीसी अमेरिकेत क्रिकेटला चालना देण्याऐवजी नफ्याला प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डायमंड क्लब विभागात या हाय व्होल्टेज सामन्याचे तिकीट सुमारे २० हजार डॉलर्स म्हणजेच १६ लाख ६४ हजार १३८ रुपयांना विकले जात असल्याचा दावा ललित मोदी यांने केला आहे.  

भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्याचे प्रत्येक तिकीट २० हजार डॉलरमध्ये विकत आहे, याचे मला आश्चर्य वाटले. खेळाचा विस्तार करण्यासाठी आणि अधिकाधिक चाहत्यांना सामील करून घेण्यासाठी हा वर्ल्ड कप अमेरिकेत आयोजित केला जात आहे. नफा कमावण्यासाठी नाही, असे मोदी याने ट्विट केला. ललित मोदीने काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. ICC नुसार सुरुवातीची किंमत सुमारे ३०० डॉलर्स म्हणजेच २५ हजार ते १० हजार डॉलर्स म्हणजेच ८ लाख आहे. भारतीय संघ ५ जूनला आयर्लंडविरुद्ध मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर अ गटात भारताचा सामना यजमान अमेरिका आणि कॅनडाशी होणार आहे. 

भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह; राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तान