T20 World Cup 2024 : आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी सर्वच संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघाची पहिली बॅच न्यूयॉर्कला पोहोचली आहे. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. ही मालिका संपताच दोन्हीही संघ अमेरिकेला रवाना होतील. पाकिस्तान आणि इंग्लंड यांचा विश्वचषकात एकही सराव सामना होणार नाही. पाकिस्तानने विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये यष्टीरक्षक आझम खानला देखील संधी मिळाली आहे. याचाच दाखला देत माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कान टोचले.
आझम खानचा फिटनेस पाहता मी त्याला कधीच राष्ट्रीय संघाच्या जवळ देखील येऊ दिले नसते असे आफ्रिदीने सांगितले. पाकिस्तानातील एका चॅनेलवर बोलताना आफ्रिदी म्हणाला की, मी आझम खानचा फिटनेस पाहता कधीच संघाच्या जवळ येऊ दिले नसते. त्याच्यात टॅलेंट आहे हे मान्य असले तरी त्याचा फिटनेस चांगला नाही. तो मोठे फटके मारण्यात माहिर आहे. इंग्लिश खेळपट्टीवर त्याला मदत मिळेल यात शंका नाही. पण वेस्ट इंडिजमध्ये तो संघर्ष करताना दिसण्याची शक्यता आहे. या अशा फिटनेसवर त्याला यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पडता येणार नाही असे मला वाटते.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -
बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
पाकिस्तानचे सामने -
६ जून – अमेरिका विरुद्ध, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, डॅलस
९ जून – भारत विरुद्ध, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
११ जून - कॅनडा विरुद्ध, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
१६ जून – आयर्लंड वि. सेंट्रल ब्रोवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा