मेलबोर्न : टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद फिफा विश्वचषकात इंग्लंडच्या फुटबॉलसाठी प्रेरणादायक ठरेल, असा विश्वास इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने व्यक्त केला. कर्णधार म्हणून बटलरचा हा पहिलाच विश्वचषक आहे.
पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याआधी पत्रकारांनी विचारले की, तुमच्या जेतेपदामुळे देशाच्या फुटबॉल संघाला प्रेरणा लाभेल काय? यावर जोस म्हणाला, ‘निश्चितच! मलादेखील हीच अपेक्षा आहे. इंग्लिश संस्कृतीत खेळाला मोठे महत्त्व आहे. विश्वचषकात संघांना पाठिंबा देणे इंग्लंडमध्ये नेहमीचे असते. आम्हाला किती पाठिंबा मिळतो, हे आपणही अनुभवू शकता.’ इंग्लंड संघ फिफा विश्वचषकाच्या ब गटात इराण, वेल्स आणि अमेरिकेसोबत आहे.