Join us  

T20 World Cup 2022 schedule : पुढील वर्ल्ड कपच्या तारखा झाल्या जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली थेट एन्ट्री, कोणाला जावं लागेल पात्रता फेरीतून 

T20 World Cup 2022 schedule : ऑस्ट्रेलियन संघानं दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचला आणि प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचे जेतेपद नावावर केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 11:19 AM

Open in App

T20 World Cup 2022 schedule : ऑस्ट्रेलियन संघानं दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचला आणि प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघाचे जेतेपद नावावर केलं. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे कडवे आव्हान सहज परतावून लावले. १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी वादळी खेळी केली आणि ऑसींनी ८ विकेट्सनं हा सामना जिंकला. पण, आता ऑस्ट्रेलियाची खरी कसोटी लागणार आहे, कारण पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियातच होणार आहे. त्यांच्यासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे आणि ICCनं आज पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तारखा सोमवारी जाहीर केल्या.

T20 World Cup 2022 schedule : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा २०२०मध्ये ऑस्ट्रेलियात होणार होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा स्थगित केली गेली आणि त्यांना २०२२च्या स्पर्धा आयोजनाचा मान दिला गेला. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२च्या Super 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. ओमान ( फेब्रुवारी) आणि झिम्बाब्वे ( जून व जुलै) येथे दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत आणि त्यातून संघ  पहिल्या राऊंडमध्ये Super 12मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील. '' ऑस्ट्रेलियात आयसीसीच्या स्पर्धेच्या पुनरागमनासाठी आम्ही तयार आहोत आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२साठीच्या सात यजमान शहरांची घोषणा करण्यात आम्हाला आनंद होत आहे,''असे स्पर्धा आयोजनाचे मुख्य ख्रिस टेटली यांनी सांगितले.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आॅस्ट्रेलियान्यूझीलंड
Open in App