Join us

"विराट कोहली लवकरच टी-२०मधून निवृत्त होईल; कुटुंबाला प्राधान्य देईल"

टी-२० मध्ये कोहली यापुढे करणार नाही संघाचं नेतृत्त्व; कोहलीच्या नावावर एकाही आयसीसी स्पर्धेचं जेतेपद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 08:47 IST

Open in App

मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने गमावल्यानं भारताला उपांत्य फेरी गाठता आली नाही. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही अखेरची स्पर्धा होती. त्यामुळे आता कोहली टी-२० मध्ये भारताचं नेतृत्त्व करताना दिसणार नाही. कोहलीनं कर्णधारपद सोडलं असताना आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज मुश्ताक अहमदनं वेगळाच दावा केला आहे.

कोहली टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपदच सोडणार नाही, तर तो टी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करेल, असा दावा मुश्ताकनं केला आहे. 'विराट कुटुंबाला प्राधान्य देतो. तो टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर नेतृत्त्व करणार नाही. तो क्रिकेट खेळणंही सोडेल. त्याला एक मुलगीदेखील आहे,' असं मुश्ताक म्हणाला. तो जिओ टीव्हीशी संवाद साधत होता. कोहलीचं संपूर्ण लक्ष आता एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटवर असेल. तो तिथे मोठमोठे विक्रम रचेल. तो संपूर्ण लक्ष आता तिथेच केंद्रीत करेल, असा दावा मुश्ताकनं केला.

भारतीय संघ बीसीसीआयमुळे दोन गटांत विभागला गेल्याचा दावा पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकनं केला आहे. 'कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी आधी आली होती. मग बीसीसीआयनं त्या वृत्ताचं खंडन केलं. शेवटी कोहलीला कर्णधारपद सोडावं लागलं. यावेळी टीम इंडिया मुंबई आणि दिल्ली अशा दोन गटांत विभागली गेली आहे,' असं हक म्हणाला.

विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड आणि पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला. भारतानं अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियावर मोठे विजय मिळवले. पण न्यूझीलंडनं पाचपैकी चार सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली.

टॅग्स :विराट कोहलीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App