Join us  

T20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे ओपनर्स कोण असावेत? माजी सिलेक्टरच्या उत्तरानं कोहली होईल नाराज

T20 World Cup 2021: भारताची सलामीजोडी कोण असावी? याबाबतही अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 4:13 PM

Open in App

T20 World Cup 2021: यंदाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन होणार आहे. टी-२० वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ कसा असेल याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीय. इतकंच काय, तर भारताची सलामीजोडी कोण असावी? याबाबतही अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघानं सलामीसाठी शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, इशान किशन आणि स्वत: कर्णधार विराट कोहली या पर्यायांचा वापर करुन पाहिला. तरी अजूनही ओपनिंग कुणी करावी याबाबत ठाम मत तयार झालेलं नाही. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समतीचे माजी सदस्य सरनदीप सिंह यांनी भारतीय संघानं सलामीजोडीसाठी अनुभवी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचीच निवड करावी, असं मत व्यक्त केलं आहे. 

भारतीय संघाच्या सलामीसाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनाच पहिली पसंती असल्याचं कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी म्हटलं होतं. तर शिखर धवनकडे तिसरा पर्याय म्हणून पाहिलं जाईल, असंही कोहली म्हणाला होता. पण इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये केएल राहुल पूर्णपणे अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं. तर अखेरच्या सामन्यात स्वत: कर्णधार कोहलीनं ओपनिंग केली. रोहित आणि कोहलीनं भारतीय संघासाठी दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनीही अर्धशतकं ठोकली. सामना संपल्यानंतर कोहलीनं IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ओपनिंग करणार असल्याचं जाहीर केलं होतं. यासोबत भारतीय संघासाठी देखील ओपनिंगची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं होतं. 

रोहित-धवनची अनुभवी जोडी सर्वात उत्तमदरम्यान, वर्ल्डकपसाठी भारतीय संघाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं निवड समितीकडून सांगण्यात आलं आहे. याच दरम्यान निवडसमितीचे माजी सदस्य सरनदीप यांनी भारतीय संघानं एका अनुभवी जोडीसोबत मैदानात उतरावं असा सल्ला दिला आहे. "शिखर धवननं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो टी-२० मध्ये नेहमीच संघाला चांगली सुरुवात करुन देतो. शिखर धवन मानसिकरित्या सक्षम खेळाडू आहे. काही पर्यायांची चाचपणी करण्याची कोहलीची इच्छा असू शकते पण वर्ल्डकपसारख्या स्पर्धेसाठी रोहित-धवनसारख्या अनुभवी जोडीनंच मैदानात उतरायला हवं. तोच संघासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल", असं सरनदीप म्हणाले. 

'वर्ल्डकप'साठी IPL ठरेल निर्णायकसरनदीप सिंग ऑस्ट्रोलिया दौऱ्यापर्यंत भारतीय संघाच्या निवड समितीचे सदस्य होते. त्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. भारतीय संघात जागा तयार करणं खूप कठीण काम आहे. पण IPL स्पर्धेतून नक्कीच मदत होईल, असं सरनदीप म्हणाले. "फक्त एका सामन्यावरुन कुणाच्या खेळीबाबत तुम्ही एखाद्या खेळाडूबाबत निर्णय घेणं योग्य ठरत नाही. वर्ल्डकपसाठी संघ निवडीसाठी आयपीएल स्पर्धा खूप महत्वाची ठरणार आहे. इशान किशनला देखील संघात जागा तयार करण्यासाठी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल", असं सरनदीप सिंग म्हणाले.  

टॅग्स :शिखर धवनटी-20 क्रिकेटविराट कोहलीरोहित शर्माभारत विरुद्ध इंग्लंड