Join us  

T20 WC 2024: "खरोखर मला वर्ल्ड कप जिंकायचा आहे", रोहित शर्माचं निवृत्तीबद्दलही भाष्य

Rohit Sharma News: रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 4:53 PM

Open in App

Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामानंतर लगेचच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ३७ वर्षीय रोहित शर्माने त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल भाष्य केले असून भारतासाठी विश्वचषक जिंकण्याची इच्छा हिटमॅनने व्यक्त केली आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने वन डे विश्वचषक २०२३ खेळला होता. सलग दहा सामने जिंकल्यानंतर यजमानांना अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. 

एका कार्यक्रमात बोलताना रोहित शर्माने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. तो म्हणाला की, मला आणखी काही वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. मी आताच्या घडीला निवृत्तीबद्दल विचार करत नाही. पण, मला देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. आगामी काळात होणारी २०२५ ची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आम्ही जिंकू अशी आशा आहे. मला आशा आहे की, हे सर्व करण्यात भारतीय संघाला यश मिळेल. 

ऑस्ट्रेलियाने भारताच्या तोंडचा घास पळवला

मागील वर्षी भारतात झालेल्या विश्वचषकातील पराभवावर रोहितने उघडपणे भाष्य केले. त्याने सांगितले की, आम्ही ज्या लयनुसार खेळत होतो ते पाहता आमचा पराभव होईल असे वाटत नव्हते. अंतिम सामन्यात आमचा दिवसच खराब होता असे म्हणावे लागेल. तसेच ऑस्ट्रेलियाने आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. उपांत्य फेरीत विजय मिळाला तेव्हा मला वाटले की आता केवळ एक पाऊल दूर आहे. 

दरम्यान, वन डे विश्वचषक २०२३ मध्ये भारतासाठी विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. तर रोहित शर्मा ५९७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. सांघिक खेळीच्या जोरावर यजमानांनी आपला विजयरथ कायम ठेवला होता. ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघाने अभियान सुरू केले पण अंतिम सामन्यात कांगारूंनी पराभवाचा वचपा काढत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. 

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024