Join us  

T20 : भारताची श्रीलंकेवर मात

पुणे : फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या सरस कामगिरीच्या जोरावर दृष्टिहीनांच्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट सामन्यात यजमान भारताने सोमवारी श्रीलंकेवर ३९ ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 1:57 AM

Open in App

पुणे : फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या सरस कामगिरीच्या जोरावर दृष्टिहीनांच्या टष्ट्वेंटी-२० क्रिकेट सामन्यात यजमान भारताने सोमवारी श्रीलंकेवर ३९ धावांनी सहज मात केली. २० चेंडूंत ३० धावा आणि २४ धावांत २ बळी अशी प्रभावी अष्टपैलू कामगिरी करणारा दुर्गा राव विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

स्वारगेटजवळील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ही लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १९० अशी भक्कम धावसंख्या उभारली. डी. व्यंकटेश्वर याने सर्वाधिक ५० धावांचे योगदान दिले. दुर्गा राव (२७), सुनील रमेश (२६), कर्णधार अजय रेड्डी (नाबाद २५), नरेश तुमडा (१८), अनिल गारिया (१६) यांनीही उपयोगी योगदान दिले. प्रत्युत्तरात, भारताच्या गोलंदाजांनी पाहुण्या श्रीलंकेला ९ बाद १५१ धावांवर रोखत एकतर्फी विजयाची नोंद केली. उभय संघांतील दुसरा सामना मंगळवारी मुंबईत होणार आहे.

दृष्टिहीनांची टी-२० : ३९ धावांनी सरशी, विजयाचा शिल्पकार दुर्गा रावची अष्टपैलू कामगिरी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गारिया-राव जोडीने अवघ्या ३१ चेंडूंत अर्धशतकी सलामी दिली. राव याने २६ चेंडूंत २७ धावांच्या खेळीत २ चौकार लगावले. ६७ चेंडूंत भारताने शतकी वेस ओलांडली. मध्यफळीतील फलंदाज व्यंकटेश्वर याने आक्रमक फटकेबाजी करताना ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने ५ चौकार लगावले.

व्यंकटेश्वर ज्या वेगाने फलंदाजी करीत होता, ते पाहता भारत द्विशतकी मजल मारणार, असे वाटत होते. मात्र, व्यंकटेश्वर धावबाद झाल्यानंतर धावांचा वेग थोडा मंदावला. ११० चेंडूंत १५० धावा करणाऱ्या भारतीय संघाला उर्वरित ५० चेंडूंत ४६ धावाच करता आल्या. कर्णधार अजय रेड्डीने २५ चेंडूंत नाबाद २५ धावांचे योगदान दिले. स्टार खेळाडू पुण्याचा अमोल कर्चे याला मात्र आज सूर गवसला नाही. अवघ्या एका धावेवर तो धावबाद झाला. श्रीलंकेतर्फे सुरंगा संपतने २५ धावांत २ गडी बाद केले.

विजयासाठी १९१ धावांचे आव्हान श्रीलंकेला अजिबातही पेलवले नाही. या संघाचा डाव ९ बाद १५१ धावांवर मर्यादित राहिला. स्टार खेळाडू के. सिल्व्हा (५० चेंडूंत ५७ धावा, ३ चौकार) आणि प्रियांतकुमार (१६ चेंडूंत २३ धावा, २ चौकार) यांचा अपवाद वगळता श्रीलंकेचे इतर फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. सुनील रमेश आणि बसप्पा वड्डगोल यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत दुर्गा राव याला मोलाची साथ दिली. भारतीय खेळाडूंनी सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहुण्या संघाच्या ४ फलंदाजांना धावबाद केले.

टॅग्स :पुणेभारत