शारजा, टी-10 लीग : बंगाल टायगर्स संघाने टी-10 लीगमध्ये गुरूवारी सिंधीस संघावर 7 विकेट राखून विजय मिळवला. जेसन रॉय ( 64), सुनील नरीन ( 22) आणि मोहम्मद नबी ( नाबाद 25) यांनी टायगर्सच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
अँटोन डेव्हसिच ( 64) आणि समिऊल्लाह शिनवारी ( 44) यांनी फटकेबाजी करताना सिंधीस संघाला 4 बाद 134 धावांपर्यंत मजल मारून दिली. संघाचा कर्णधार शेन वॉटसन (6) दुसऱ्याच षटकात माघारी परतल्यानंतर डेव्हसिच आणि शिनवारी यांनी आतषबाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी करताना संघाला शतकी आकडा गाठून दिला. डेव्हसिचने टी-10 लीगमधले पहिले अर्धशतक पूर्ण करताना 23 चेंडूंत 64 धावांची खेळी साकारली. त्यात त्याने 5 षटकार व 6 चौकार लगावले. दुसऱ्या बाजूला शिनवारीने 26 चेंडूंत 2 षटकार व 4 चौकारांसह 44 धावा केल्या. अखेरच्या षटकात मोहम्मद नबीने बाद केल्याने त्याला अर्धशतक पूर्ण करता आले नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि सुनील नरीन यांनी चार षटकांत 61 धावा चोपून काढल्या. 6 चेंडूंत 3 उत्तुंग षटकार आणि एक खणखणीत चौकार खेचत 22 धावांची खेळी करणाऱ्या नरीनला फवाद अहमदने बाद केले. त्यानंतर एस. रुदरफोर्डने (16) दुसऱ्या विकेटसाठी रॉयसह 45 धावांची भागीदारी करताना टायगर्सला विजयपथावर ठेवले. रॉयने 35 चेंडूंत 5 षटकार व 6 चौकार लगावत 64 धावांची खेळी केली. नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रॉय बाद झाल्यामुळे टायगर्सच्या विजय मार्गात अडथळा निर्माण झाला. मात्र, मोहम्मद नबीने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार लगावत टायगर्सला 7 विकेट राखून विजय मिळवून दिला.