शारजा, टी-10 लीग : मराठा अरेबियन्स आणि पखतून्स यांच्या टी-10 लीगमधील बुधवारी झालेला सामना पखतून्सने 8 विकेट्स राखून जिंकला. अरेबियन्सच्या 126 धावांचे लक्ष्य पखतून्सने 9.2 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. कॅमेरून ( 36*) डेलपोर्ट आणि कॉलिन इंग्राम ( 42*) यांनी फटकेबाजी करताना पखतून्सचा विजय निश्चित केला. शफिकुल्लाहने 35 धावांची खेळी करताना संघाच्या विजयात हातभार लावला. पण, या सामन्यात चर्चा रंगली ती हेलिकॉप्टर शॉट्सची. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शोध लावलेला हा फटका बुधवारच्या सामन्यात पाहायला मिळाला. अरेबियन्स संघाच्या रशिद खानने मारलेला हा फटका पाहून वीरेंद्र सेहवागही खुर्चीवर उठून टाळ्या वाजवू लागला.
पखतून्सने नाणेफेक जिंकून अरेबियन्सना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. अरेबियन्सचे सलामीवीर झटपट माघारी धाडून पखतून्सने हा निर्णय योग्य ठरवला. हझरतुल्लाह जाझई ( 4) आणि अॅलेक्स हेल्स ( 6) हे स्वस्तात बाद झाल्यानंतर नजीबुल्लाह झार्दान ( 36) आणि कामरान अकमल ( 25) यांनी संघाचा डाव सावरला. ब्रेंडन टेलर ( 23* ) आणि रशिद ( 21) यांनी तळाला फटकेबाजी करताना संघाला 6 बाद 125 धावांपर्यंत मजल मारून दिली. रशिदने 9व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर धोनी स्टाईल मारलेला फटका, सर्वांना अवाक् करणारा होता.