Join us

T10 League : थकलेल्या अरेबियन्सची वॉरियर्सपुढे शरणागती, अंतिम फेरीत धडक

नॉर्दर्न वॉरियर्सने मिळालेल्या दुसऱ्या संधीचं सोनं करताना टी-10 लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 23:25 IST

Open in App

शारजा, टी-10 लीग : नॉर्दर्न वॉरियर्सने मिळालेल्या दुसऱ्या संधीचं सोनं करताना टी-10 लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या इलिमिनेटर सामन्यात त्यांनी मराठा अरेबियन्सवर दहा विकेट राखून सहज विजय मिळवला. अर्ध्यातासाहून कमी कालावधीत दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरलेले अरेबियन्सचे खेळाडू थकलेले जाणवले. त्यांच्या फटक्यांत त्राणच जाणवत नव्हते. त्यामुळे त्यांना 10 षटकांत 72 धावा करता आल्या. वॉरियर्सने हे लक्ष्य 5 षटकांत पूर्ण केले. वॉरियन्सला अंतिम फेरीत पखतून्सचा सामना करावा लागणार आहे.अर्ध्यातासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा फलंदाजीला आलेल्या अरेबियन्सच्या अॅलेक्स हेल्सला नॉर्दर्न वॉरियर्सविरुद्ध 6 धावांवर माघारी परतावे लागले. ख्रिस ग्रीनच्या षटकात त्याला जीवदान मिळाले, परंतु दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हेल्स बाद झाला. पुढच्याच षटकात हझरतुल्लाह जझाई (15) आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर ग्रीनच्या हातात झेल देऊन माघारी परतला. नजीबुल्लाह झाद्रान ( 8) आणि कामरान अकमल ( 5) यांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. वॉरियर्सच्या गोलंदाजांनी संथ चेंडू टाकून अरेबियन्सच्या धावगतीवर लगाम लावली. त्यांचे पाच फलंदाज 58 धावांवर माघारी परतले होते. कर्णधार ड्वेन ब्राव्होकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु तोही मोठा फटका मारताना झेल बाद झाला. अरेबियन्सला 10 षटकातं 8 बाद 72 धावाच करता आल्या.निकोलस पूरणने पहिल्याच षटकात 12 धावा चोपून आपला हेतू स्पष्ट केला. त्याने टी-10 लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही नावावर केला. पहिल्या दोन षटकांत पूरण आणि लिंडल सिमन्स या जोडीने 33 धावा चोपल्या. या जोडीन सामना झटपट संपवण्यावरच भर दिला. दोघांनी अरेबियन्सच्या गोलंदाजीवर प्रहार करताना 73 धावांचे लक्ष्य 5 षटकांत पार केले. पूरणने 16 चेंडूंत 43, तर सिमन्सने 14 चेंडूंत 31 धावा केल्या.

टॅग्स :टी-10 लीग