ठळक मुद्देनिकोलस पूरण आणि आंद्रे रसेल यांची जोरदार फटकेबाजी नॉर्दर्न वॉरियर्सचा केरळ नाईट्सवर 8 विकेट राखून विजय मर्यादित षटकांचा स्पेशालिस्ट ख्रिस गेल अपयशी
शारजा, टी-10 लीग : निकोलस पूरण आणि आंद्रे रसेल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर नॉर्दर्न वॉरियर्स संघाने टी-10 लीगमध्ये गुरुवारी केरळ नाईट्सवर 8 विकेट राखून विजय मिळवला. पूरणने नाबाद 43, तर रसेलने नाबाद 29 धावांची खेळी केली. वॉरियर्सने 102 धावांचे लक्ष्य 7.2 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल सात षटकं खेळपट्टीवर टिकूनही मोठी खेळी करू शकला नाही.
वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पॉल स्टिर्लिंग आणि ख्रिस गेल ही जोडी नाईट्सने मैदानावर उतरवली. दहा षटकांच्या या सामन्यात गेल सुरुवातीपासून आक्रमण करेल असे वाटले होते, परंतु तो संयमी खेळीवरच भर देत होता. त्याउलट स्टिर्लिंगने फटकेबाजी केली. आंद्रे रसेलने सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गेलला बाद केले. गेलने 18 चेंडूंत 14 धावा केल्या आणि त्यात केवळ एकच चौकार होता. दुसरीकडे स्टिर्लिंगने 28 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचताना 60 धावांची खेळी केली. कर्णधार इयॉन मॉर्गनने 13 चेंडूंत नाबाद 17 धावा केल्या. नाईट्स संघाला 2 बाद 102 धावांवर समाधान मानावे लागले.
धावांचा पाठलाग करताना वायन पार्नेलने वॉरियर्सच्या लेंडल सिमन्सला तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले. मात्र, बेनी हॉवेलने रोवनम पॉवेलला बाद करून वॉरियर्सला धक्का दिला. एका बाजूने निकोलस पूरणने फटकेबाजी करताना वॉरियर्सच्या विजयाचा मजबूत पाया रचला. पूरणने 18 चेंडूंत 5 षटकार व 2 चौकार खेचताना नाबाद 43 धावा केल्या. त्याला रसेलने 10 चेंडूंत 4 षटकार खेचून नाबाद 29 धावा करत चांगली साथ दिली.