शारजा, टी-10 लीग : ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलला संघात स्थान देऊन प्रतिस्पर्धी संघावर दडपण निर्माण करण्याचा केरळ नाईट्सचा डाव फसला. टी-10 लीगमधील गुरुवारी नाईट्स संघाने नॉर्दर्न वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात गेलचा समावेश केला. पण, सातव्या षटकापर्यंत खेळपट्टीवर थांबूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे नाईट्स संघाला 10 षटकांत 2 बाद 101 धावाच करता आल्या.
वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पॉल स्टिर्लिंग आणि गेल ही जोडी नाईट्सने मैदानावर उतरवली. दहा षटकांच्या या सामन्यात गेल सुरुवातीपासून आक्रमण करेल असे वाटले होते, परंतु तो संयमी खेळीवरच भर देत होता. त्याउलट स्टिर्लिंगने फटकेबाजी केली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर गेल फटकेबाजी करेल असे वाटले होते. पण, त्याची बॅट आज रुसलेली दिसली. आंद्रे रसेलने सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गेलला बाद केले. गेलने 18 चेंडूंत 14 धावा केल्या आणि त्यात केवळ एकच चौकार होता.
दुसरीकडे स्टिर्लिंगने 28 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकार खेचताना 60 धावांची खेळी केली. कर्णधार इयॉन मॉर्गनने 13 चेंडूंत नाबाद 17 धावा केल्या. नाईट्स संघाला 2 बाद 102 धावांवर समाधान मानावे लागले.