Join us  

T-20 World Cup : सामन्यापूर्वीच भारतीय संघ घाबरला होता, इंझमाम उल-हकने लगावला 'विराट' टोला

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभव स्वीकारला नाही. मात्र, यंदाच्या विश्वचषक टी-20 स्पर्धेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 9:51 AM

Open in App

नवी दिल्ली - भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर, भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, तर अनेकांनी संघाचा मनोधैर्य खचू नये, यासाठी टीम इंडियाच्या खेळीचं कौतुकही केलं. आता, पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने भारत-पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीवर भाष्य केलं आहे. भारताचा विराट संघ प्रचंड दबावाखाली होता, तो सामन्यापूर्वीच घाबरलेला होता, असे इंझमामने म्हटले आहे. 

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध कधीही पराभव स्वीकारला नाही. मात्र, यंदाच्या विश्वचषक टी-20 स्पर्धेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या सलामीच्या जोडीने 152 धावांचा पाठलाग करत भारतीय संघावर 10 गडी राखून विजय मिळवला. तसेच, विश्वचषक स्पर्धेतील गेल्या 30 वर्षांचा विक्रमही मोडीत काढला. पाकिस्तानच्या या विजयाचे सर्वत्र कौतुक झाले. पाकिस्तानमध्येही जल्लोष साजरा करण्यात आला. तर, भारतीय क्रिकेट चाहत्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. आता, भारतीय संघाच्या तेव्हाच्या खेळीबाबत इंझमाम उल हकने प्रतिक्रिया दिली आहे.  

यंदाच्या T-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रभाव दिसलाच नाही.  तो उपांत्य फेरीत जाण्याआधीच बाहेर पडला, आठ वर्षांत प्रथमच हे घडले. विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत टीम इंडियाला प्रवेश मिळू शकला नाही. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर भारत आणखीनच दबावाखाली खेळत होता, असे इंझमामने म्हटले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील टीम इंडियाच्या उदासीनतेबद्दल इंझमाम उल हकने मत मांडलं आहे. 

संघ आणि रोहित शर्माही दबावात

कर्णधार विराट कोहलीचा भारतीय संघ नाणेफेक करण्यापूर्वीच घाबरल्याचे दिसून आले. भारतीय संघ सामन्यापूर्वीच घाबरला असल्याचे मला वाटते. कारण, नाणेफेकीनंतर मैदानात विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या देहबोलीतून फरक खूप काही सांगून जातो. या दोन्ही कर्णधारांच्या मुलाखती पाहिल्यास कोण दडपणाखाली होते हेही समजते, असे इंझमामने म्हटले आहे. पाकिस्तानच्या संघाची देहबोली भारतीय संघापेक्षा चांगली होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर टीम इंडिया आणखी दबावात दिसली, तर रोहित शर्माही दबावाखालीच खेळत होता. त्यामुळे, संपूर्ण संघच दबावात होता, हे स्पष्ट होते, असे इंझमाम उल-हकने एआरवाय न्यूजशी बोलताना म्हटले आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App