सिडनी : भारतीय महिला संघ टी२० विश्वचषक उपांत्य फेरीत बलाढ्य इंग्लंडविरुद्ध खेळेल. ‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्यादरम्यानची लढत पावसामुळे रद्द झाल्यामुळे इंग्लंड दुसऱ्या स्थानी राहिला. हा सामना रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला एक गुण मिळाला आणि त्यांनी ‘ब’ गटात सात गुणांसह अव्वल स्थान मिळवले.
प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारताने ‘अ’ गटात चारही सामने जिंकत आठ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तीन विजय व एक पराभवासह सहा गुणांची कमाई करणारा इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान गुरुवारी उपांत्य लढत होईल. २०१८ मध्ये यापूर्वी खेळल्या गेलेल्या स्पर्धेतही उभय संघ उपांत्य फेरीत खेळले होते. इंग्लंडने २०१८ मध्ये टी२० विश्वचषक उपांत्य लढतीत भारताचा पराभव केला होता, पण अंतिम फेरीमध्ये त्यांना आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरी उपांत्य लढत दक्षिण आफ्रिका आणि ‘अ’ गटातील संघ व चारवेळचा चॅम्पियन आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सिडनी मैदानावर होईल. (वृत्तसंस्था)