Join us  

अंबाती रायुडू Live सामन्यात खेळाडूच्या अंगावर धावून गेला, पाहा नेमकं काय घडलं?

अंबाती रायुडूचं रागावर नियंत्रण राहत नाही याची उदाहरणं आपण याआधीही पाहिली आहेत. आता पुन्हा एकदा रायुडू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 6:03 PM

Open in App

अंबाती रायुडूचं रागावर नियंत्रण राहत नाही याची उदाहरणं आपण याआधीही पाहिली आहेत. आता पुन्हा एकदा रायुडू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच्या अंगावर धावून जातानाचा रायुडूचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सौराष्ट्र आणि बडोदा यांच्यातील सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत हा प्रकार घडला आहे. 

'एलीट ग्रूप डी'मधील सामना सुरू होता. यात अंबाती रायुडू आणि शेल्डन जॅक्सन यांच्यात भर मैदानात राडा झाला. ही घटना सामन्याच्या ९ व्या षटकात घडली. सौराष्ट्राचा जॅक्सन फलंदाजी करत होता. चेंडूला सामोरे जाताना वेळकाढूपणा केल्यानं रायुडूनं जॅक्सनला फटकारलं आणि त्याच्या दिशेनं तो धावून गेला. जॅक्सनला रायुडूचं असं संतापून बोलणं आवडलं नाही आणि त्यानंही प्रत्युत्तर दिलं. जॅक्सन हातात बॅट घेऊन रागाच्या भरात रायडूच्या दिशेने जाऊ लागला.

दुसरीकडे रायुडूही जॅक्सनच्या अंगावर धावला. प्रकरण चिघळत असल्याचं पाहून पंच आणि बाकीच्या खेळाडूंना मदतीला यावं लागलं. अंपायरनं रायडूला दूर नेलं. त्यानंतर प्रकरण शांत झालं. रायुडू आपल्या रागामुळे अनेकदा वादात सापडला आहे. २०१७ मध्ये त्याचं रस्त्यातच एका वृद्ध व्यक्तीसोबत भांडण झालं होतं. रायडू वेगानं कार चालवत होता. त्यावर एका वृद्धानं त्याला अडवल्यानं रायुडू कारमधून खाली उतरला आणि वाद घालू लागला होता.

आयपीएलमध्ये हरभजन सिंगवर भडकला होता रायुडूरायुडू २०१६ च्या आयपीएलमध्ये हरभजन सिंगवर भडकला होता. त्यानं हरभजन सिंगच्या चेंडूवर गचाळ क्षेत्ररक्षण केलं, ज्यावर भज्जी संतापला. त्यानं रायडूला उद्देशून रागाच्या भरात काहीतरी म्हटलं आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. २०१९ च्या विश्वचषकात रायुडूला संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर सोशल मीडियात रायुडूनं एक ट्विट देखील केलं होतं. ज्यावरुन बराच गदारोळ झाला होता.

टॅग्स :अंबाती रायुडू
Open in App