भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह अन्य ८ भारतीय खेळाडूंचा मुंबई लीग २०२५ साठी आयकॉन खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या टी-२० लीगसाठी आयकॉन खेळाडूंची यादी जाहीर केली. सहा वर्षांच्या अंतरानंतर टी-२० मुंबई लीगचे पुनरागमन होत आहे. या लीगचे तिसरे सत्र २६ मे ते ८ जून दरम्यान वानखेडे स्टेडियमवर आयोजित केले जाईल.
सूर्यकुमार, रहाणे आणि श्रेयस यांच्याशिवाय आयकॉन खेळाडूंमध्ये सरफराज खान, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांचेही नाव आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले की, 'देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला अभिमान वाटणाऱ्या आठ आयकॉन खेळाडूंची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे, जे मुंबई क्रिकेटच्या वारशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची उपस्थिती केवळ उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा आणि मार्गदर्शन करणार नाही तर त्यांना शिकण्याची उत्तम संधी देखील प्रदान करेल.'
प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघात एक आयकॉन खेळाडू निवडण्याची परवानगी असेल, ज्यामुळे संघांना अनुभव आणि पॉवर दोन्ही मिळेल. एमसीए लवकरच लिलावाची तारीख जाहीर करेल. या टी-२० लीगमध्ये आठ फ्रँचायझी संघ सहभागी होतील, अशी माहिती देण्यात आली.