नवी दिल्ली : भारतीय संघाचा यष्टिरक्षक ३५ वर्षांचा रिद्धिमान साहा याच्या उजव्या बोटावर मुंबईत मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली. कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या गुलाबी चेंडूच्या दिवस- रात्र कसोटीदरम्यान साहाला दुखापत झाली होती.
साहा लवकरच तंदुरुस्त होऊन बेंगळुरूच्या राष्टÑीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होईल, असेही सांगण्यात आले. याआधी आॅक्टोबर महिन्यात द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी दरम्यानदेखील साहाला अशीच जखम झाली होती. बांगलादेशविरुद्ध मालिकेआधी तो संघात परतला होता. २०१८ च्या आयपीएलमध्ये खांद्याला दुखापती झाल्यामुळे साहावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
साहाने कसोटीत नुकतेच यष्टिमागे १०० बळी पूर्ण केले आहेत. त्याचवेळी, साहा न्यूझीलंडविरुद्धच्या २१ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होईल, अशी माहिती संघ व्यवस्थापनाच्या सूत्राकडून मिळाली. (वृत्तसंस्था)
पाच आठवड्यात तंदुरुस्त होईन - साहा
उजव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया झालेला भारतीय कसोटी संघाचा यष्टिरक्षक- फलंदाज रिद्धिमान साहा याने पाच आठवड्यात मैदानावर परतण्याचा निर्धार व्यक्त केला. तो म्हणाला, ‘ही दुखापत पाच आठवड्यात बरी होईल.
घरी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर मी पुनर्वसन कार्यक्रमासाठी एनसीएत जाणार आहे.’ भारताला पुढील कसोटी न्यूझीलंडविरुद्ध फेब्रुवारीत खेळायची असल्याने साहाकडे तंदुरुस्त होण्यास बराच वेळ आहे.