नवी दिल्ली : असे म्हटले जाते की, विक्रम हे मोडण्यासाठीच बनले जातात. मात्र क्रिकेटविश्वातील असे अनेक विक्रम आहेत जे वर्षानुवर्षे अद्याप कायम आहेत. असाच एक शानदार विक्रम तब्बल ४९ वर्षांनंतरही कायम असून भारताचे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी हा विश्वविक्रम रचला आहे. गावस्कर यांनी १९ एप्रिल १९७१ रोजी वेस्ट इंडिज येथे पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रचला होता. मात्र अजूनही कोणत्याही फलंदाजाला हा विश्वविक्रम मोडता आलेला नाही.
पाच कसोटी सामन्यांच्या त्या ऐतिहासिक मालिकेत गावस्कर यांनी चार सामन्यांमध्ये ७७४ धावांचा एव्हरेस्ट उभारला होता. हा पराक्रम करताना गावस्कर यांनी विंडीजचेच जॉर्ज हेडली यांचा ५१ वर्षे जुना विक्रम मोडला होता. हेडली यांनी १९३० साली इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ७०३ धावा कुटल्या होत्या. देशांतर्गत स्पर्धेतील शानदार कामगिरीच्या जोरावर विंडीज दौऱ्यावर गेलेल्या गावस्कर यांना मालिकेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, यानंतर पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या दुसºया कसोटी सामन्यात पदार्पण करताना त्यांनी पहिल्या डावात ६५ आणि दुसºया डावात नाबाद ६७ धावा केल्या होत्या.
या संपूर्ण मालिकेत केवळ एका डावाचा अपवाद वगळता गावस्कर यांनी प्रत्येक डावात ५० हून अधिक धावा फटकावल्या. विशेष म्हणजे या मालिकेत त्यांनी चारवेळा शतकी तडाखा दिला. पोर्ट आॅफ स्पेन येथेच खेळविण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात त्यांनी एकामागून एक विक्रमांचा डोंगर रचला. पहिल्या डावात त्यांनी १२४ धावांची शानदार खेळी केली. या जोरावर भारताने ३६० धावा केल्या.
मात्र नंतर विंडीजने ५२६ धावा उभारल्या आणि भारतीय संघ दबावाखाली आला. परंतु यानंतर गावस्कर यांनी सर्व सूत्रे आपल्याकडे घेत २२० धावांची जबरदस्त खेळी केली. दखल घेण्याची बाब म्हणजे यासह गावस्कर कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक ठोकणारे विजय हजारे (१९४७-४८) यांच्यानंतरचे केवळ दुसरे भारतीय ठरले होते. तसेच डग वॉल्टर्स यांच्यानंतरचे एकाच कसोटी सामन्यात शतक आणि द्विशतक ठोकणारेही केवळ दुसरे फलंदाज ठरले. त्यातही दात दुखत असतानाही त्या वेदना सहन करीत गावस्कर यांनी ही ऐतिहासिक खेळी साकारली होती, हे विशेष.
या दोन दमदार खेळींच्या जोरावर गावस्कर यांनी मालिकेत ७७४ धावांचा एव्हरेस्ट उभारला. मात्र तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाला आपल्या पदार्पणात या धावसंख्येच्या आसपासही जाता आलेले नाही. यानंतर व्हिव रिचडर््स (इंग्लंडविरुद्ध १९७६ साली ८२९ धावा), मार्क टेलर (इंग्लंडविरुद्ध १९८९ साली ८३९) आणि ब्रायन लारा (इंग्लंडविरुद्ध १९९३-९४ साली ७९८ धावा) यांनी एकाच मालिकेत गावस्कर यांच्याहून अधिक धावा फटकावल्या. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडविरुद्ध ७७४ धावा फटकावून गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली, मात्र ही त्याची पदार्पणाची मालिका नव्हती.
दरम्यान, एकाच मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विश्वविक्रम दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर अद्यापही कायम असून, त्यांनी इंग्लंडविरुद्धच १९३० साली ९७४ धावा चोपल्या होत्या. (वृत्तसंस्था)