Sunil Gavakar Wankhede Stadium Mumbai: मुंबई क्रिकेट असोसिएशनने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांना मोठा गौरव करणार आहे. आपल्या फलंदाजीच्या बळावर 'लिटल मास्टर' हा किताब पटकावणारे सुनील गावस्कर यांचा एक खास पुतळा वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार आहे. एमसीएने याची पुष्टी केली आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष शरद पवार यांचाही खास पुतळा बनवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात याचे उद्घाटन होणार आहे.
सुनील गावस्कर यांना मिळणार खास सन्मान
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये एक क्रिकेट संग्रहालय बांधले जाणार आहे. त्याचे नाव एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालय असे ठेवण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन या महिन्याच्या उत्तरार्धात होणार आहे. या संग्रहालयात सुनील गावस्कर यांचा पुतळा ठेवण्यात येणार आहे. सुनील गावस्कर यांच्याव्यतिरिक्त, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुतळा देखील येथे ठेवण्यात येणार आहे.
या सन्मानाबाबत सुनील गावसकर म्हणाले, "मला खूप आनंद आणि सन्मान वाटत आहे. माझ्या संघटनेने, मुंबई क्रिकेट असोसिएशनने माझा पुतळा नवीन एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा नेहमीच आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी क्रिकेटमध्ये मोठा होऊ शकलो आणि मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. या क्षणी मी किती आनंदी आहे हे मी सांगू शकत नाही."
शरद पवारांचाही गौरव
शरद पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते यापूर्वी एमसीए, बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष होते. या संग्रहालयाचे नाव त्यांच्या नावावर आहे. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले की, शरद पवार क्रिकेट संग्रहालय हे मुंबई क्रिकेटमधील दिग्गजांना आमचे नमन आहे. हे संग्रहालय त्यांच्या विचारसरणीचे आणि यशाचे प्रतीक आहे. सुनील गावस्कर यांचा पुतळा दृढनिश्चयाचे प्रतीक बनेल, जो तरुण खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ती सत्यात उतरवण्यास प्रेरित करेल.
Web Title: Sunil Gavaskar will be honored at his home ground as statue will be inaugerated at Wankhede Stadium
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.