Join us  

तयारीतील उणिवांमुळे भारत झाला पराभूत; अपयशामागे अनेक कारणे: सुनील गावसकर

एका आठवड्यापेक्षाही कमी कालावधीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 8:14 AM

Open in App

एका आठवड्यापेक्षाही कमी कालावधीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावल्या. पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय साजरा करण्यासाठी निघालेल्या भारताने दौऱ्याची सुरुवात स्वप्नवत केली होती. 

मात्र, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यात भारतीय संघ अपयशी ठरल्यामुळे मालिकेचा शेवट निराशाजनक झाला. भारताच्या अपयशामागे अनेक कारणे आहेत. पण, महत्त्वाचे कारण म्हणजे सामन्यासाठी लागणाऱ्या तयारीमधल्या उणिवा. भारतीय उपखंडाबाहेर खेळताना खासकरून सेना (द.आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये जर मालिका असेल तर एक गोष्ट करणे महत्त्वाचे ठरते ते म्हणजे या देशांतील दौऱ्यावर थोडे आधी जाणे, सराव सामने खेळणे. कारण यामुळे तिथल्या खेळपट्ट्या, वातावरण आणि एकंदर सर्व गोष्टींसोबत जुळूवून घेण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय साजरा करणारा भारतीय संघ हा दौरा सुरू होण्याच्या बऱ्याच आधी तिथे दाखल झाला होता. एक प्रथम श्रेणी सामनासुद्धा खेळला होता. याशिवाय कसोटी मालिकेआधी भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळला. त्यामुळे खेळाडू तिथल्या परिस्थितीशी एकरुप झाले होते. म्हणूनच पिंक बॉल कसोटीत मोठा पराभव स्वीकारूनही भारतीय संघ पुनरागम करण्यात यशस्वी ठरला होता. 

भारताच्या कसोटी इतिहासातला हा एक मोठा मालिका विजय होता. होऊ शकतं की, कोरानामुळे कमीत कमी लोकांच्या संपर्कात येण्यासाठी भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत कुठलेही सराव सामने आयोजित करण्यात आलेले नसावे. असे पण होऊ शकते की, भारताने दक्षिण आफ्रिकेला कमी लेखले असावे. 

कारणं काहीही असो, पण वस्तुस्थिती हिच आहे की भारतीय संघ पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेत पहिला मालिका विजय साजरा करण्यात अपयशी ठरला. एकदिवसीय मालिकेतील एक सामना अजूनही शिल्लक आहे आणि चाहत्यांची ही अपेक्षा असेल की, भारतीय संघ किमान या सामन्यात तरी विजय मिळवून दौऱ्याची यशस्वी सांगता करेल. जर यासाठी संघात बदल करावा लागला, तरी तो निर्णय घ्यायला हवा. कारण, यातूनच संघात नवी ऊर्जा भरवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा खेळाडूंना संधी दिली पाहिजे की, जे आतापर्यंत हरलेल्या संघाचा भाग नाही किंवा ज्यांची  सकारात्मक मानसिकता आहे. कारण, असेच खेळाडू भारतीय संघाला विजयी करण्यासाठी त्यांचे सर्वस्व झोकून द्यायला मागे-पुढे बघणार नाही. उणिवा झाकण्याऐवजी त्या सुधारण्याची योग्य वेळ आता आलेली आहे. (टीसीएम)

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसुनील गावसकर
Open in App