Join us

अश्विनची निवड केवळ सांत्वना देण्यासाठीच; सुनील गावसकर यांचे मत

आगामी टी-२० विश्वचषकासाठी रविचंद्रन अश्विनची भारतीय संघात निवड होणे हा काही योगायोग नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 07:59 IST

Open in App

नवी दिल्ली : आगामी टी-२० विश्वचषकासाठी रविचंद्रन अश्विनची भारतीय संघात निवड होणे हा काही योगायोग नाही. इंग्लंड दौऱ्यात एकाही सामन्यात संधी न मिळालेल्या या अनुभवी फिरकी गोलंदाजाला विश्वचषक संघात केवळ सांत्वना देण्यासाठीच निवडले, असे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त करीत क्रिकेट शौकिनांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

निवडकर्त्यांनी अश्विनला दिलासा देण्यासाठीच निवडले. कदाचित अंतिम एकादशमध्ये अभावानेच त्याला संधी दिली जाईल. अश्विनची संघात निवड होणे मुळात सर्वांना बुचकळ्यात टाकणारे आहे. अश्विन गेली चार वर्षे टी-२० संघात नाही. आतापर्यंत त्याने ४६ टी-२०त ५२ गडी बाद केले असून एका षटकात ७ पेक्षा कमी धावा मोजल्या. भारतासाठी त्याने २०१७ ला अखेरचा टी-२० सामना खेळला होता. अश्विनच्या निवडीवर गावसकर म्हणाले,‘ अश्विनचे संघात पुनरागमन होणे आनंदाची बाब आहे. पण त्याला अंतिम एकादशमध्ये स्थान दिले जाईल? इंग्लंडमध्ये तो एकाही सामन्यात दिसला नाही. इंग्लंड दौऱ्यातील निराशा दूर करण्यासाठीच संघात निवडले असावे.

आयपीएलमध्ये दाखविली चमक 

अश्विनचा आयपीएलमधील रेकॉर्ड फारच प्रभावी आहे. त्याने मागच्या सत्रात यूएईत १५ सामन्यात १३ गडी बाद केले. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १५६ सामन्यात १३९ बळींची नोंद आहे. अश्विनची गोलंदाजी समजणे अनेक फलंदाजांसाठी कोडे आहे. आयपीएलमध्ये त्याची सरासरी केवळ ६.९० अशी आहे. 

टॅग्स :आर अश्विनसुनील गावसकर
Open in App