सुदर्शन, राहुलचे अर्धशतक; तरीही फलंदाजी ढेपाळली

दुसरा एकदिवसीय सामना : दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 05:33 AM2023-12-20T05:33:30+5:302023-12-20T05:33:42+5:30

whatsapp join usJoin us
Sudarshan, Rahul's half-century; Still, the batting was sloppy ind vs SA 2nd ODI | सुदर्शन, राहुलचे अर्धशतक; तरीही फलंदाजी ढेपाळली

सुदर्शन, राहुलचे अर्धशतक; तरीही फलंदाजी ढेपाळली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ग्याबेखा (द. आफ्रिका) : नांद्रे बर्गर, ब्युरन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची फलंदाजी ढेपाळली. साई सुदर्शन, कर्णधार लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांनंतरही भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताचा डाव ४६.२ षटकांत २११ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाड (४) बर्गरच्या चेंडूवर पायचीत झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि तिलक वर्मा (१०) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४२ धावा जोडल्या. बर्गरच्या चेंडूवर वर्मा हेंड्रिक्सकडे झेल देऊन परतला. त्यानंतर कर्णधार के. एल. राहुल आणि साई सुदर्शन यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची मोलाची भागीदारी केली. ही जोडी भारताला मोठी मजल मारून देणार असे वाटत असताना साई सुदर्शन विलियम्सचा बळी ठरला. सुदर्शनने ८३ चेंडूंत सात चौकार व एका षट्कारासह ६२ धावांचे योगदान दिले. संजू सॅमसन (१२) मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात पुन्हा अपयशी ठरला. ६४ चेंडूंत सात चौकारांसह ५६ धावा करणारा राहुल बर्गरच्या चेंडूवर बाद झाला. रिंकू सिंगने आक्रमक सुरुवात केली. ३५व्या षटकात त्याने १६ धावांची वसुली करत यजमानांची अडचण केली. 

पण, महाराजच्या चेंडूने त्याला चकविले आणि तो यष्टिचीत झाला. रिंकूने १४ चेंडूंत दोन चौकार व एका षट्कारासह १७ धावा केल्या. तळात अर्शदीप सिंगने (१८) एकाकी झुंज दिली. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने तीन, ब्युरन हेंड्रिक्स व केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन, लिझाद विलियम्स आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

कॅलेंडर वर्षात एक हजार धावा करणारा   राहुल हा मधल्या फळीतील सहावा फलंदाज ठरला. याआधी मोहम्मद अझरुद्दीन (१९९७), अजय जडेजा (१९९९), राहुल द्रविड (२००४), युवराज सिंह (२००७), महेंद्रसिंग धोनी (२००८) यांनी अशी कामगिरी केली आहे.

पहिल्या दोन सामन्यांत ५० पेक्षा अधिक धावा करणारा साई सुदर्शन हा नवज्योत सिंद्धू (१९८७) यांच्यानंतर दुसरा फलंदाज ठरला.

धावफलक

भारत : ऋतुराज गायकवाड पायचीत गो. बर्गर ४, साई सुदर्शन झे. क्लासेन गो. विलियम्स ६२, तिलक वर्मा झे. हेंड्रिक्स गो. बर्गर १०, के. एल. राहुल झे. मिलर गो. बर्गर ५६, संजू सॅमसन त्रि. गो. हेंड्रिक्स १२, रिंकू सिंग स्टं. क्लासेन गो. महाराज १७, अक्षर पटेल झे. के. वेरेने गो. मार्कराम ७, कुलदीप यादव झे. हेंड्रिक्स गो. महाराज १, अर्शदीप सिंग झे. मिलर गो. हेंड्रिक्स १८, आवेश खान धावबाद (मल्डर) ४, मुकेश कुमार नाबाद ४. अवांतर : ११. एकूण ४६.२ षटकांत सर्वबाद २११.

बादक्रम : १-४, २-४६, ३-११४, ४-१३६, ५-१६७, ६-१६९, ७-१७२, ८-१८६, ९-२०४, १०-२११.
गोलंदाजी : नांद्रे बर्गर १०-०-३०-३, लिझाद विलियम्स ९-१-४९-१, ब्युरन हेंड्रिक्स ९.२-१-३४-२, वियान मल्डर ४-०-१९-०, केशव महाराज १०-०-५१-२, एडन मार्कराम ४-०-२८-१.

Web Title: Sudarshan, Rahul's half-century; Still, the batting was sloppy ind vs SA 2nd ODI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.