पुणे : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्यामुळेच आयपीएलचा प्रयोग यशस्वी झाला. मात्र, त्यांच्याबद्दल मी अधिक बोलणार नाही, असे वक्तव्य खासदार शरद पवार यांनी पुण्यात केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या सत्कार समारंभानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट क्षेत्रातील अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी आयपीएल स्पर्धेमुळे अनेक नवोदित खेळाडूंच्या कारकिर्दीला आकार मिळाल्याचे सांगत स्पर्धेचे कौतुक केले. तसेच, ही स्पर्धा सुरू करण्यात ललित मोदींचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. भारताने जगाला दिलेला अत्यंत देखणा खेळ आपण सुरू केला आहे. त्यामुळे क्रिकेटचे अर्थकारणच बदलून गेले आहे, असेही ते म्हणाले. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी सचिन तेंडुलकरनेच महेंद्रसिंग धोनी याची शिफारस केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
धोनी हा झारखंडचा खेळाडू आहे -
असा विचार न करता तो देशाचा खेळाडू आहे असा विचार करा. तो नक्कीच देशासाठी ऐतिहासिक कामगिरी करेल, असा विश्वास सचिनने दिल्याची आठवणही पवारांनी सांगितली. तसेच, क्रिकेटसाठी केलेल्या अनेक तरतुदींमुळेच आज अनेक खेळाडूंची जडणघडण होत असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.