रांची - भारतीयांचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. येथे क्रिकेटला धर्माचा आणि क्रिकेटपटूंना देवाचा दर्जा दिला जातो. त्यामुळे क्रिकेटचा सामना म्हटला की भारतातील आबालवृद्ध तो पाहण्यासाठी धावपळ करतात. या देशात असेल लाखो क्रिकेटप्रेमी सापडतील. पण आयपीएलमध्ये धोनीला खेळताना पाहण्यासाठी एका शालेय विद्यार्थ्याने जे काही केले ते वाचून तुम्हाला धक्का बसल्यावाचून राहणार नाही. झारखंडमघील रामगड येथील एका 16 वर्षांच्या विद्यार्थ्यांने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात झालेला सलामीचा सामना पाहण्यासाठी घरातून पळून तब्बल 1750 किमी अंतर पार करत मुंबई गाठली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड राज्यातील रामगडमधील बांदा गावातील सौरभ साहो हा दहावीत शिकणारा विद्यार्थी गुरुवारपासून बेपत्ता होता. शाळेत गेलेल्या सौरभची स्कूटर जंगलात सापडल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. पोलीस तक्रार केली गेली. कुणी अपहरणाची शक्यता वर्तवली. पोलिसांनीही सूत्रे हलवत वेगाने तपास सुरू केला. मात्र या तपासानंतर जी काही माहिती समोर आली ती धक्कादायक होती.
क्रिकेटचं याड लागलेला सौरभ हा महेंद्रसिंग धोनीचा चाहता आहे. आयपीएलमध्ये धोनीला पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना पाहण्यासाठी सौरभ आतूर होता. मात्र मुंबईत जाऊन क्रिकेट सामना पाहण्याची घरातून परवानगी मिळणार नाही म्हणून त्याने पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी शाळेतून घरी येताना त्याने आपली स्कूटर अर्ध्यावर जंगलात टाकून मुंबईकडे येणारी ट्रेन पकडली.
दुसरीकडे पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याचा ठावठिकाणा घेतला. तसेच त्याचे अपहरण झाले नसून तो क्रिकेट सामना पाहण्यासाठी मुंबईत गेल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. पोलिसांकडून सौरभ सुखरूप असल्याचे कळल्यानंतर त्याचे वडील अशोक साहो आणि कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.