Join us  

IPL: अजब योगायोग! मुंबई इंडियन्सच्या पराक्रमाला आज ७ वर्षे पूर्ण; राजस्थानलाच दिला होता धक्का

या आठवणीविषयी मुंबई इडियन्सने ट्वीटही केले आहे. ‘७ वर्षांपूर्वी आम्ही दुसऱ्यांदा सीएलटी-२० ट्रॉफी जिंकली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 2:32 PM

Open in App

मुंबई : Indian Premier League (IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यामध्ये कट्टर सामना रंगेल. मुंबईने सलग दोन सामने जिंकले असून राजस्थानने सलग दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे या सामन्यात मुंबईचे पारडे वरचढ मानले जात आहे. या सामन्याच्या निमित्ताने आज एक अजब योगायोगही घडून येत आहे. आजच्याच दिवशी ७ वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी (सीएलटी-२०) पटकावली होती. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात मुंबईने राजस्थानवर ‘रॉयल’ विजय मिळवला होता. त्यामुळेच आजच्या मुंबई - राजस्थान सामन्याला विशेष महत्त्वा प्राप्त झाले आहे.

या आठवणीविषयी मुंबई इडियन्सने ट्वीटही केले आहे. ‘७ वर्षांपूर्वी आम्ही दुसऱ्यांदा सीएलटी-२० ट्रॉफी जिंकली होती आणि सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) ब्ल्यू-गोल्ड जर्सीमधील हा अखेरचा सामनाही ठरला,’ अशी पोस्ट मुंबई इंडियन्सने केली. विशेष म्हणजे आजच मुंबई इंडियन्स आपल्या सहाव्या आयपीएल सामन्यासाठी मैदानावर उतरणार असून सामना करणार आहे तो राजस्थान रॉयल्सचा. २०१३ साली साली झालेल्या सीएलटी-२० च्या अंतिम सामन्यात मुंबईने राजस्थानलाच ३३ धावांनी नमवूने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळेच या सामन्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थानने मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी दिली. ड्वेन स्मिथ (४४), रोहित शर्मा (३३) आणि ग्लेन मॅक्सवेल (३७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने ६ बाद २०२ धावांचा डोंगर उभारला होता. यानंतर स्टार फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने ३२ धावांत ४ बळी घेत राजस्थानचे कंबरडे मोडले आणि त्यांचा डाव १८.५ षटकांत १६९ धावांत संपुष्टात आला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्सच्या जर्सीतील हा अखेरचा सामना ठरला होता.

टॅग्स :मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्ससचिन तेंडुलकररोहित शर्मा