Join us  

पाकविरुद्ध स्वस्तात बाद झाला, म्हणून स्टीव्ह स्मिथची स्वतःलाच शिक्षा

अ‍ॅशेस मालिकेत खोऱ्यानं धावा करून इंग्लंडच्या तोंडचा घास पळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची धावांची भूक कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 7:49 PM

Open in App

अ‍ॅशेस मालिकेत खोऱ्यानं धावा करून इंग्लंडच्या तोंडचा घास पळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची धावांची भूक कायम आहे. पण, पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ती पूर्ण करण्यात स्मिथ अपयशी ठरला. त्यामुळे आयसीसीच्या कसोटी फलंदाज क्रमवारीत स्मिथचे अव्वल स्थान धोक्यात आले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि स्मिथ यांच्यात केवळ तीन गुणांचा फरक आहे. त्यात पाकविरुद्धच्या पहिल्याच सामन्यातील अपयशामुळे स्मिथ प्रचंड निराश झाला आणि त्यानं स्वतःलाच शिक्षा केली.

पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 240 धावा केल्या. असाद शफिकनं सर्वाधिक 76 धावा करताना पाकिस्ताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क ( 4/52), पॅट कमिन्स ( 3/60) आणि जोश हेझलवूड ( 2/46) यांनी पाकिस्तानला धक्के दिले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरनं 296 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीनं 154 धावा कुटल्या. जोस बर्नचे शतक तीन धावांनी हुकलं. त्यानं 166 चेंडूंत 10 चौकारांसह 97 धावा केल्या. मार्नस लॅबुश्चॅग्नेनं कसोटीतील पहिले शतक झळकावताना 185 धावांची खेळी केली. 279 चेंडूंत त्यानं 20 चौकार मारले. मॅथ्यू वेडनं 60 धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाला 580 धावांपर्यंत मजल मारून दिली.

पाकिस्तानचा दुसरा डाव 335 धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळालं. हेझलवूड ( 4/63), मिचेल स्टार्क ( 3/73) आणि पॅट कमिन्स ( 2/69) यांनी पाकचा धाव गुंडाळला. पाकिस्तानला एक डाव व 5 धावांनी हार मानावी लागली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

या सामन्यात स्मिथला 10 चेंडूंत केवळ 4 धावा करता आल्या. यासीर शाहनं त्याला त्रिफळाचीत केलं. या अपयशानंतर स्मिथनं स्वतःला तीन किलोमीटर धावण्याची शिक्षा दिली. याबाबत स्मिथ म्हणाला,'' धावा झाल्या नाही, तर मी नेहमी स्वतःला शिक्षा करतो. जसं मी धावा केल्यावर बक्षीस म्हणून स्वतःला चॉकलेट देतो हे तसेच आहे. त्यामुळे धावा न झाल्यामुळे मी तीन किलोमीटर धावलो.''

टॅग्स :स्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियापाकिस्तान