Join us  

ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार? दिग्गजांची भारतीय खेळाडूंना पसंती, स्टार्कवरही विश्वास

आयपीएलचा आगामी सतरावा हंगाम २२ मार्चपासून खेळवला जात आहे.

By ओमकार संकपाळ | Published: March 15, 2024 4:50 PM

Open in App

IPL 2024: आयपीएल म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच... उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळकरी, महाविद्यालयातील तरूणाईपासून ते ज्येष्ठ नागरिकांना क्रिकेटकडं आकर्षित करणारी लीग म्हणजे आयपीएल. जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग म्हणून आयपीएलची गणना केली जाते. आयपीएलचा आगामी सतरावा हंगाम २२ मार्चपासून खेळवला जात आहे. सर्वच संघ तयारीला लागले असून खेळाडू आपापल्या संघांसोबत जोडले जात आहेत. विविध कारणांनी आयपीएल २०२४ चा हंगाम खास असणार आहे. मुंबई इंडियन्स नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात प्रथमच दिसेल, तर रिषभ पंत जीवघेण्या अपघातानंतर प्रथमच मैदानात दिसणार आहे. 

आगामी आयपीएल हंगामाबद्दल चर्चा करण्यासाठी आजी माजी खेळाडूंची 'स्टार स्पोर्ट्स'वर मैफिल रंगली. या कार्यक्रमात स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथ, अंबाती रायुडू, डेल स्टेन आणि इरफान पठाण हे सहभागी झाले होते. यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधिंनी आयपीएल २०२४ बद्दल काही प्रश्न विचारले. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण असेल यावर दिग्गजांचं मत जाणून घेण्यात आलं. 

२२ तारखेपासून आयपीएलचा थरार

अलीकडेच भारतीय संघाचा माजी खेळाडू अंबाती रायुडूनं रोहित शर्माबद्दल एक मोठं विधान केलं होतं. रोहित शर्मा मुंबईच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रायुडू म्हणाला की, रोहितनं चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायला हरकत नाही. धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर रोहित यशस्वीपणे सीएसकेचं कर्णधारपद सांभाळू शकतो. याबद्दल आज रायुडूला आणखी विचारलं असता त्यानं सांगितलं की, रोहित सीएसकेच्या संघात गेला तर चांगलंच होईल. तो इतकी वर्ष मुंबईकडून खेळला आहे, हे सत्य असलं तरी मी आणि हरभजन सिंग... आम्ही देखील मुंबईचा भाग होतो पण चेन्नईच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं. सीएसके हा एक सर्वोत्तम संघांपैकी एक आहे.  

लोकेश राहुल विश्वचषकाच्या संघात असेल का? या प्रश्नावर इरफान पठाण म्हणाला की, फ्रँचायझी क्रिकेटपेक्षा भारतीय क्रिकेट महत्त्वाचं आहे यात शंका नाही. पण, आगामी आयपीएलमध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. इशान किशन, संजू सॅमसन आणि लोकेश राहुल यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असेल. राहुल आयपीएलमध्ये मधल्या खेळीत खेळतो का हे देखील महत्त्वाचे असेल, त्याची खेळी विश्वचषकातील स्थान स्पष्ट करेल असं मला वाटतं. 

दिग्गजांची 'मन की बात'

मुंबई इंडियन्सच्या नवनिर्वाचित कर्णधारासमोर मोठी आव्हाने असतील. रोहित शर्मा अद्याप भारतीय संघाचा कर्णधार आहे, त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे. आगामी विश्वचषकात तोच टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. पण, हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू असल्यानं त्याच्यासमोर आव्हानं असतील. रोहितच्या नेतृत्वात मुंबईनं पाचवेळा किताब जिंकला आहे. हार्दिकमध्ये गोलंदाजी, फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि कर्णधारपद सांभाळण्याचं कौशल्य आहे. पण साहजिकच त्याच्या खांद्यावरचं ओझं वाढलं आहे, असं अंबाती रायुडूनं नूमद केलं. तर हार्दिक पांड्या एक यशस्वी कर्णधार असून रोहित शर्मा सलामीवीर म्हणून खेळल्यामुळं त्याचं दडपण काहीसं कमी होईल, असा विश्वास स्टीव्ह स्मिथनं व्यक्त केला.  

दरम्यान, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोण जिंकणार याबद्दल प्रत्येकानं वेगवेगळं मत मांडलं. रोहित शर्मा मॅचविनर असल्याचं इरफान पठाणनं आवर्जुन सांगितलं. तो म्हणाला की, आयपीएलमध्ये संघ जिंकला असताना सर्वाधिकवेळा सामनावीरचा पुरस्कार रोहितनं पटकावला आहे. त्यामुळं मुंबई आणि गुजरात यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळेल. रोहित आगामी हंगामात कर्णधार नसला तरी त्याच्यासाठी हा चांगला हंगाम असेल. केवळ त्याच्यासाठीच नाही तर हे भारतीय क्रिकेटसाठी देखील चांगलं असेल. ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकेल याबद्दल प्रत्येक खेळाडूनं आपलं मत मांडलं. 

ऑरेंज कॅप कोण जिंकेल?

  • ऋतुराज गायकवाड - स्टीव्ह स्मिथ
  • यशस्वी जैस्वाल - अंबाती रायुडू
  • विराट कोहली - डेल स्टेन
  • विराट कोहली किंवा यशस्वी जैस्वाल - इरफान पठाण 

 पर्पल कॅप कोण जिंकेल?

  • भुवनेश्वर कुमार - डेल स्टेन
  • मिचेल स्टार्क - स्टीव्ह स्मिथ
  • राशिद खान - अंबाती रायुडू
  • कुलदीप यादव - इरफान पठाण 
टॅग्स :आयपीएल २०२४इरफान पठाणअंबाती रायुडूविराट कोहलीऋतुराज गायकवाडयशस्वी जैस्वाल