आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं बदललेलं रूप आणि व्यावसायिकता यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अचानक रामराम ठोकणाऱ्या खेळाडूंचं प्रमाण गेल्या काही काळात वाढलं आहे. तसेच काही क्रिकेटपटू आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन क्रिकेटमध्ये पुनगारमनही करतात. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत देत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ३२ वर्षीय डिकॉकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. क्विंटन डिकॉक याने २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. तर २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपनंतर डिकॉकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र तो टी-२० क्रिकेटमध्ये खेळत होता.
दरम्यान, ३२ वर्षीय क्विंटन डिकॉक याने निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर दोन वर्षांनी आपला निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून टी-२० क्रिकेटबरोबरच एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासही डिकॉक तयार झाला आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यासाठी डिकॉकला दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय नामिबियाविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी-२० सामन्यासाठी डिकॉकचा संघात समावेश करण्यात आला आहे.
क्विंटन डिकॉकने दक्षिण आफ्रिकेकडून १५५ एकदिवसीय सामन्यात खेळताना ४५.७४ च्या सरासरीने ६७७० धावा कुटल्या आहेत. यादरम्यान, त्याने २१ शतके आणि ३० अर्धशकतो ठोकली होती. तर डिकॉक याने ५४ कसोटी आणि ९२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामनेही खेळले आहेत.