गोवा: गोव्यामध्ये सुरु असलेल्या दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या तिरंगी मालिकेतील आजच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने इंग्लंडचा २४ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिकल्यावर श्रीलंकेचा कर्णधार प्रियांथा कुमार याने प्रथम फलंदानी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत श्रीलंकेच्या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी रचली. त्यानंतर इंग्लंडने कमी वेळातच लंकेचे ४ फलंदाज बाद केले, परंतु तोपर्यंत श्रीलंकेच्या संघाने २०० टप्पा पार केला होता. श्रीलंकेने २० षटकांमध्ये २०५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सावध सुरुवात केली. सलामीची दोन्ही फलंदाज त्यांच्या अर्धशतकांपर्यंत पोहोचले आणि सामन्यावर पकड मिळवली. परंतु श्रीलंकेच्या अनुभवी गोलंदाजांनी खेळाच्या शेवटी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडला २० षटकांमध्ये १८१ धावांवर रोखून २४ धावांनी विजय मिळविला. भारताविरुद्ध अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी उद्या हे संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.