कोलंबो : श्रीलंकेच्या क्रिकेट वर्तुळामध्ये मोठा भूकंप आल्याचे म्हटले जात आहे. कारण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने संघाच्या प्रशिक्षकांसह त्यांच्या संपूर्ण संघालाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने प्रशिक्षक चंडिका हथुरसिंघा यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी मिकी आर्थर यांची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आर्थर यांच्याकडे प्रशिक्षणाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी आर्थर हे पाकिस्तानचे प्रशिक्षक होते. पण इंग्लंड येथे झालेल्या विश्वचषकानंतर आर्थर यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर पाकिस्तानने आर्थर यांना मुदतवाढ दिली नाही आणि या पदावर माजी कर्णधार मिसबाह उल हकची निवड केली.
श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने प्रशिक्षक आर्थर यांच्याबरोबर दोन वर्षांचा करार केला आहे. त्याबरोबर श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने संपूर्ण प्रशिक्षण देणारी टीमचं बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थर हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. त्याचबरोबर झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू ग्रँट फ्लावरला फलंदाजी प्रशिक्षकपदी नेमण्यात आले आहे. गोलंदाजी प्रशिक्षकपदी डेव्हिड साकेर यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी शेन मॅकडरमॉट यांची निवड केली गेली आहे.
हथुरसिंघा यांनी २०१७ साली बांगलादेशच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांची श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. पण आतापर्यंत त्यांचा प्रशिक्षकपदाचा कालावधी संपलेला नाही आणि त्यांच्याबद्दल क्रिकेट मंडळाने कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे कोणतेही कारण न देता क्रिकेट मंडळाने हथुरसिंघा यांची उचलबांगडी केली आहे, असे म्हटले जात आहे.