Join us  

श्रीलंकेने क्लीन स्वीप टाळला; अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ३ गड्यांनी पराभव

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर औपचारिकता राहिलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 8:43 AM

Open in App

कोलंबो : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतल्यानंतर औपचारिकता राहिलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. मात्र, या सामन्यात वर्चस्व राखले ते यजमान श्रीलंकेने. त्यांनी भारताचा ३ गड्यांनी पराभव करत मानहानिकारक पराभव टाळला. भारताला ४३.१ षटकांत २२५ धावांत गुंडाळल्यानंतर श्रीलंकेने ३९ षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात लक्ष्य गाठले.

श्रीलंकेने विजय मिळवला असला, तरी भारताने त्यांना चांगलेच झुंजवले. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला. मिनोद भानुका (७) लवकर बाद झाल्यानंतर अविष्का फर्नांडो व भानुका राजापक्षे यांनी १०९ धावांची भागीदारी करत लंकेच्या विजयाचा पाय रचला. अविष्काने ९८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ७६ धावांची खेळी केली. त्याला उत्तम साथ दिलेल्या राजापक्षेने ५६ चेंडूंत १२ चौकारांसह ६५ धावा केल्या. भारताकडून राहुल चहरने ३, तर चेतन सकारियाने २ बळी घेतले. ३ बाद १९३ अशा सुस्थितीत असलेल्या लंकेने २६ चेंडूंत ४ बळी गमावल्याने त्यांची ७ बाद २२० धावा अशी घसरगुंडी उडाली. मात्र, रमेश मेंडिस आणि अकिला धनंजय यांनी लंकेला विजयी केले.

त्याआधी, पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात यशस्वी ठरला नाही. पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसननेही मोठी खेळी करण्याची संधी गमावली. सूर्यकुमार यादव स्थिरावलेला दिसत असताना बाद झाल्याने भारताच्या धावगतीला खीळ बसली.  भारताने २३ षटकांत ३ बाद १४७ धावांची मजल मारली असताना आलेल्या पावसामुळे काहीवेळ सामना थांबला. त्यानंतर भारताला ठराविक अंतराने धक्के बसले. धनंजय व प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

दुसऱ्यांदा पाच भारतीयांचे पदार्पण

- भारतीय संघाने तब्बल पाच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली.  संघात प्रयोग करताना फलंदाज नितीश राणा, लेग स्पिनर राहुल चहर, वेगवान गोलंदाज चेतन सकारिया, ऑफ स्पिनर कृष्णप्पा गौतम व यष्टिरक्षक संजू सॅमसन यांना खेळविले.- याआधी, १९८० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे भारताकडून एकदिवसीय सामन्यात एकाचवेळी पाच खेळाडूंचे पदार्पण झाले होते. दिलीप जोशी, कीर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील आणि तिरुमलई श्रीनिवासन यांनी त्यावेळी पदार्पण केले होते.

संक्षिप्त धावफलक 

भारत : ४३.१ षटकांत सर्वबाद २२५ धावा (पृथ्वी शॉ ४९, संजू सॅमसन ४६, सूर्यकुमार यादव ४०; अकिला धनंजय ३/४४, प्रवीण जयविक्रमा ३/५९, दुष्मंता चमीरा २/५५.) पराभूत वि. श्रीलंका : ३९ षटकांत ७ बाद २२७ धावा (अविष्का फर्नांडो ७६, भानुका राजापक्षे ६५; राहुल चहर ३/५४, चेतन सकारिया २/३४.) 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघश्रीलंका