- रोहित नाईक
नवी मुंबई : आपल्या झंझावाती फलंदाजीने क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने गुरुवारी नवी मुंबईतून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. इंग्लंडच्या मिडलसेक्स क्लबच्या साहाय्याने सचिनने आपल्या ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’चा शुभारंभ केला असून याद्वारे तो नवोदित खेळाडूंना क्रिकेटचे धडे देणार आहे. सचिनने प्रशिक्षक म्हणून आपला बालपणीचा मित्र विनोद कांबळी याच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. यामुळे सचिन - विनोद या दिग्गज विश्वविक्रमीजोडीकडून शिकण्याची सुवर्णसंधी नवोदित खेळाडूंना मिळेल. यानिमित्ताने सचिन तेंडुलकरने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
मिडलसेक्स क्लबसोबत करार करण्याचा उद्देश काय?
मिडलसेक्सला स्वत:चा १५४ वर्षांचा इतिहास आहे. त्यांनी अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू क्रिकेटविश्वाला दिले आहेत. जेव्हा आपण फलंदाजीला जातो तेव्हा मोठ्या भागीदारीसाठी तेवढ्याच ताकदीचा किंवा क्षमतेचा साथीदार लागतो व मिडलसेक्स तसाच एक उत्कृष्ट साथीदार आहे.
नवोदितांना खेळापलीकडे कोणती शिकवण मिळणार?
माझ्या वडिलांनी दिलेला संदेश मला भावी पिढीला द्यायचा आहे. माझे वडील म्हणायचे, ‘‘जीवनातील अनेक गोष्टी काही काळापुरत्या मर्यादित असतात; पण आपला स्वभाव आपल्यासोबत कायम राहणार असतो. त्यामुळे एक चांगला माणूस बनणे सर्वांत महत्त्वाचे आहे.’’ मलाही तोच संदेश द्यायचा आहे.
भारतात क्रीडा संस्कृतीसाठी कशाची गरज आहे?
कोणत्याही खेळाला वर येण्यासाठी प्रोत्साहन व पायाभूत सुविधांची गरज असते. या गोष्टी खेळाडूंसाठी ‘परफेक्ट टॉनिक’ ठरतात. चांगल्या सुविधा, प्रोत्साहन व मार्गदर्शन यांमध्ये आपण सुधारणा केली, तर नक्कीच चित्र बदलेल.
आचरेकर सरांची प्रतिक्रिया काय होती?
सर खूश होते. ते कधीच फार बोलत नाहीत, पण त्यांच्या हास्यावरून त्यांच्या भावना कळत होत्या. लहानपणापासून सामन्याआधी सरांचे आशीर्वाद घेऊन पुढे गेलोय. ही गोष्ट माझ्या अखेरच्या सामन्यापर्यंत कायम राहिली. मी व विनोद खूप वर्षांनी एकत्र सरांकडे गेलो होतो.
कांबळीवर किती मोठी जबाबदारी आहे?
विनोद प्रशिक्षक म्हणून फलंदाजीत खूप मोठे योगदान देऊ शकतो. मुलांसोबत त्याचे संबंध खूप खेळीमेळीचे असतात. पण मस्तीच्या वेळी मस्ती आणि क्रिकेटच्या वेळी फक्त क्रिकेटकडेच लक्ष द्यावे लागेल; आणि ही बाब तो नक्कीच गांभीर्याने पाळेल. त्याचा अनुभव आणि त्याचे कौशल्य मुलांसाठी अमूल्य असेल.
धोनीला टी२० संघातून डावलले गेले आहे. यावर काय सांगशील?
कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे हे सर्व निवडकर्त्यांवर अवलंबून असते. निवडकर्त्यांना व धोनीला त्यांचे काम माहीत आहे. धोनीकडे खूप मोठा अनुभव आहे. शिवाय धोनी, कर्णधार व प्रशिक्षक यांनी एकत्रितपणे २०१९ विश्वचषक स्पर्धेची योजना ठरवली असणार यात शंका नाही. देशासाठी सर्वोत्तम योगदान कसे देता येईल हेच सर्वांचे लक्ष्य आहे. जर खरेच यामुळे सकारात्मक निकाल मिळणार असेल, तर पुढे जायलाच पाहिजे. त्यामुळे मला यावर फारकाही बोलायचे नसून देशासाठी चांगले कार्य करण्यास पुढे जात राहावे एवढेच मी सांगेन.
दिल्लीतील सुखद धक्का!
मी गेल्या वर्षी एक पोस्ट टाकली होती. दिल्लीमध्ये ‘लोकमत’चा तो पहिला दिवस होता आणि दिल्ली विमानतळाच्या लाऊंजमध्ये ‘लोकमत’सारखे मराठी वर्तमानपत्र मिळणे माझ्यासाठी अनपेक्षित होते. ही गोष्ट माझ्यासाठी सरप्राईज होती. त्यामुळे मी विचार केला की ही गोष्ट सर्वांना कळायलाच पाहिजे आणि मी याची माहिती सोशल मीडियावर टाकली.
- सचिन तेंडुलकर