नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच क्रीडाविश्वामध्येही दु:खाची लाट पसरली. कोणत्याही खेळाडूला सुशांतच्या अशा अचानक जाण्याच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीए.
भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्तेचे वृत्त कळताच धक्का बसला. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. त्याचा परिवार आणि मित्रांना या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी शक्ती मिळो.’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याने मी स्तब्ध आणि दु:खी आहे. तो खूप युवा व अत्यंत गुणवान अभिनेता होता. त्याच्या परिवार, मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुशांतचे छायाचित्र पोस्ट करताना म्हटले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या अशा जाण्याने मी स्तब्ध झालो आहे. असे जीवन, ज्यामध्ये अनेक संभावना आहेत आणि अशा प्रकारे निघून जाणे अनपेक्षित. त्याच्या परिवार व प्रशंसकांच्या दु:खात मी सहभागी आहे.’ माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विट केले की, ‘मानसिक स्वास्थ्य गंभीर मुद्दा असून सध्या या मुद्द्यावर जितके लक्ष दिले जाते, त्याहून अधिक लक्ष देण्याची गरज आहे. संवेदनशीलता, सौम्य, दयाळू होणे व जे अडचणीत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूप महत्त्वपूर्ण आहे.’ त्याचप्रमाणे, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, माजी नेमबाज राज्यवर्धन राठोड, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल. क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती यांनीही सोशल मीडियाद्वारे सुशांतला श्रद्धांजली वाहिली. (वृत्तसंस्था)