Join us

...आणि प्रेक्षक मैदानात शिरले; अंतिम लढतीत हरवलेली टोपी सापडली बस कंडक्टरकडे

११ चेंडूंत २४ धावा हव्या होत्या. थॉमसन झेलबाद झाल्याचे समजून प्रेक्षकांनी पुन्हा मैदानावर धाव घेतली. मात्र, बर्ड यांनी ‘नो बॉल’ जाहीर केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:53 IST

Open in App

मतीन खानस्पोर्ट्स हेड- एव्हीपी लोकमत पत्रसमूह

१९८३ सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक अंतिम सामन्यात मोहिंदर अमरनाथच्या चेंडूवर मायकेल होल्डिंग पायचीत होताच भारत विश्वविजेता बनला. होल्डिंगला पायचीत देण्यासाठी डिकी बर्ड यांनी बोट वर केले होते. २२ सप्टेंबर रोजी या महान पंचाचे निधन झाले. क्रिकेटविश्वात जितका लौकिक डॉन ब्रॅडमन यांना लाभला तितकाच सन्मान बर्ड यांना मिळाला. 

बर्ड यांच्या कारकीर्दीतील मजेदार क्षण १९७५ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यातील होता. वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलिया या लढतीत बर्ड यांनी दिलेले निर्णय ऐतिहासिक होते. लॉर्ड्सवर विंडीजने ६० षटकांत ८ बाद २९१ धावा उभारल्या. यानंतर ऑस्ट्रेलिया ९ बाद २३३ असा पराभवाच्या उंबरठ्यावर होता; पण डेनिस लिली व जेफ थॉमसन यांनी सामना रोमांचक केला. 

‘तुम्ही मोजल्या पाहिजेत धावा, मी १७ धावा घेतल्या...’११ चेंडूंत २४ धावा हव्या होत्या. थॉमसन झेलबाद झाल्याचे समजून प्रेक्षकांनी पुन्हा मैदानावर धाव घेतली. मात्र, बर्ड यांनी ‘नो बॉल’ जाहीर केला होता. प्रेक्षकांचे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष नव्हते. फेड्रिक्सने नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. मात्र, चेंडू प्रेक्षकांमध्ये हरवला. याचवेळी बर्ड यांची पांढरी टोपी आणि स्वेटर कोणीतरी लंपास केले.  प्रेक्षकांना दुसऱ्यांदा मैदानाबाहेर हुसकावल्यानंतर बर्ड यांनी सहकारी पंच स्पन्सर यांना किती धावा द्यायच्या, अशी विचारणा. स्पेन्सर यांचे उत्तर होते,‘ दोन धावा!’ यावर थॉमसन चिडले. बर्ड यांनी लिलीला विचारले. लिली म्हणाले की, ‘धावा तुम्हीही मोजायला हव्या होत्या. मी १७ धावा काढल्या.’ अखेर बर्ड यांनी ४ धावा मंजूर केल्या.

...आणि प्रेक्षक मैदानात शिरले:  ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २६ धावांची गरज असताना थॉमसनने व्हॅनबर्न होल्डरच्या चेंडूवर लाँग लेगला चेंडू टोलवून दोन धावा घेतल्या. दरम्यान, कीथ बॉयकॉटच्या थ्रोवर यष्टीरक्षक डेरेक मरे याने यष्टी उखडविल्या. त्यामुळे विंडीजचा विजय झाला असे समजून चाहत्यांनी मैदानात धाव घेतली; पण पंच बर्ड यांचा निर्णय ‘नॉट ऑउट’ होता. त्यामुळे हिरमुसलेले  प्रेक्षक काही क्षणात मैदानाबाहेर गेले.

मग काय झाले?यानंतर तीन चेंडूंचा पुन्हा खेळ झाला. थॉमसनने एक लेग बाय, तर लिलीने एक धाव घेतली. नंतरच्या चेंडूवर थॉमसन मरेकरवी धावबाद झाला. प्रेक्षक तिसऱ्यांदा मैदानात शिरले. यावेळी काही खेळाडू चाहत्यांच्या गर्दीत अडकले. थॉमसनचे पॅड चोरीला गेले. बॉयस यांच्यावर गर्दीतील कुणीतरी पडले. बॉयसचे जोडे काढून पळविण्यात आले. पोलिसांनी मध्यस्थी करीत बॉयसला बाहेर काढले. अखेर विंडीजचा १७ धावांनी ऐतिहासिक विजय झाला.

वर्षभरानंतर...वर्षभरानंतर बर्ड बसमधून प्रवास करीत होते. बस कंडक्टर त्यांच्याकडे आला, तेव्हा त्याच्या डोक्यात पांढरी टोपी होती. डिकी यांनी विचारणा केली की, ‘तू ही टोपी कुठून खरेदी केली?’ त्यावर कंडक्टर म्हणाला, ‘मिस्टर डिकी बर्ड कोण आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही का? ही त्यांची टोपी आहे. विश्वचषकाच्या फायनलमध्ये मी त्यांच्या डोक्यातून काढली होती. आम्ही त्यावेळी मैदानात शिरलो होतो.’ बर्ड यांनी स्वत:चा परिचय देत ती टोपी त्याच्याकडून अखेर परत मिळविली.

टॅग्स :ऑफ द फिल्ड