केप टाऊन - भारताविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत झालेल्या पराभवातून सावरण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी क्रिकेट मालिका मॉर्केलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटची मालिका असेल.
2006 साली भारताविरुद्धच्या कसोटीमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मॉर्केलने आतापर्यंत 81 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये त्याने 283 बळी टिपले असून, डावात पाचहून अधिक बळी टिपण्याची किमया 7 वेळा साधली आहे. तर 112 एकदिवसीय सामन्यात त्याने 186 बळी टिपले आहेत. त्याबरोबरच मॉर्केलने 41 टी-20 सामने खेळले असून, त्यात एकूण 46 बळी टिपले आहेत.
भारताविरुद्ध नुकत्याच आटोपलेल्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत मॉर्केल खेळला होता. कसोटी मालिकेमध्ये त्याने भारतीय फलंदाजांविरोधात चांगली गोलंदाजी केली होती. मात्र एकदिवसीय मालिकेत तो लौकिकाला साजेशी गोलंदाजी करू शकला नव्हता.