T20 World Cup 2026 Semi-Final Finn Allen Slams 33 Ball 100 NZ Win In 13 Overs Enter Final : फिन ॲलनची विक्रमी सेंच्युरी आणि टिम सिफर्टच्या कडक अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सच्या मैदानावर गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी धूळ चारत न्यूझीलंडने दिमाखात फायनलमध्ये धडक मारली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मार्को यान्सेन याच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर १७० धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना फिन ॲलन याने ३३ चेंडूत नॉकआउट सामन्यात सर्वात जलद शतक झळकावत संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फिन ॲलनच्या विक्रमी शतकाच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने गाठली फायनल
फिन ॲलनच्या नाबाद शतकी खेळीशिवाय टिम सिफर्टने ३३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. रचिन रवींद्रने ११ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने १३ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडच्या संघाने १३ व्या षटकात विजय मिळवत फायनलचं तिकीट निश्चित केले. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ८ मार्चला न्यूझीलंड दुसऱ्यांदा फायनल खेळताना दिसेल. याआधी २०२१ च्या हंगामात न्यूझीलंडच्या संघाने फायनल गाठली होती. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने त्यांना पराभूत केले होते. हा संघ अजूनही आपल्या पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. उपांत्य फेरीतील विजयासह न्यूझीलंडच्या संघाने आयसीसी स्पर्धेच्या नॉकआउटमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आपला रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा 'चोकर्स' ठरला.
Aiden Markram आउट की नॉट आउट? Daryl Mitchell चा झेल अन् थर्ड अंपायरच्या निर्णयावर सगळेच शॉक (VIDEO)
टॉपर दक्षि आफ्रिका सेमीच्या परीक्षेत फेल; काठावर पास झालेल्या न्यूझीलंडनं साधला मोठा डाव
यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अपराजित राहून सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ ‘जर-तर’च्या समीकरणात अडकला होता; मात्र सरस धावगतीच्या जोरावर त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. विशेष म्हणजे, टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच वेळा पराभव पत्करलेल्या न्यूझीलंडने यावेळी हिशेब चुकता करत दणदणीत विजय मिळवला.
फायनलमध्ये कुणासोबत रंगणार सामना?
पहिल्या उपांत्य फेरीतील लढतीनंतर न्यूझीलंडच्या रुपात यंदाच्या हंगामातील पहिला फायनलिस्ट संघ मिळाला आहे. आता न्यूझीलंडचा संघ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील विजेत्यासोबत जेतेपदासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील अंतिम सामन्यात दुसरा संघ कोणता? याचा फैसला मुंबईच्या वानखडे मैदानावर गुरुवारी ५ मार्चला रंगणाऱ्या सामन्यात होईल.