2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयाचा नायक बेन स्टोक्स नववर्षातही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने सामना जिंकला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर 189 धावांनी विजय मिळवला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात स्टोक्सनं 47 चेंडूंत 72 धावांची वादळी खेळी करून इंग्लंडला मोठा पल्ला गाठून दिला. त्यानंतर त्यानं तीन विकेट घेतल्या. या विजयानंतर स्टोक्सनं हाताचं मधलं बोट लपवून विजयी सेलिब्रेशन केलं. त्याच्या या कृतीचं कौतुक होत आहे आणि त्यामागे कारणही तसंच आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील 269 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेनं 223 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसरा डाव 8 बाद 391 धावांवर घोषित करून 438 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात डॉम सिब्ली यानं 133 धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याला बेन स्टोक्स ( 72) आणि कर्णधार जो रूट ( 61) यांनी अर्धशतकी खेळी करून चांगली साथ दिली. आफ्रिकेचा दुसरा डाव 248 धावांवर गुंडाळून इंग्लंडने चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.