इंदूर : दक्षिण आफ्रिकेने सलामीला पत्करलेल्या दारूण पराभवानंतर महिला विश्वचषक स्पर्धेत गुणांचे खाते उघडताना सोमवारी न्यूझीलंडचा ६ बळींनी पराभव केला. न्यूझीलंडला ४७.५ षटकांत २३१ धावांवर गुंडाळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ४०.५ षटकांत ४ बाद २३२ धावा केल्या. ताझमिन ब्रिट्सने ८९ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह १०१ धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला विजयी केले. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
सलामीला इंग्लंडविरुद्ध ६९ धावांत गारद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन केले. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार लाॅरा वाॅल्वार्डट (१४) झटपट बाद झाल्यानंतर ब्रिट्स आणि सुन लूस यांनी दुसऱ्या बळीसाठी १७० चेंडूंत १५९ धावांची शानदार भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
ली ताहुहुने ३२व्या षटकात ब्रिट्सला बाद करून ही जोडी फोडली. मात्र, अर्धशतकवीर लूसने संघाचा विजय निश्चित केला. लूसने ११४ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह नाबाद ८१ धावा केल्या. त्याआधी, कर्णधार सोफी डीव्हाइनच्या शानदार अर्धशतकानंतरही न्यूझीलंडची मजल मर्यादित राहिली. सोफीने ९८ चेंडूंत ९ चौकारांसह ८५ धावा केल्या. नोनकुलुलेको मलाबा हिने ४० धावांत ४ बळी घेतले. न्यूझीलंडला डावातील पहिल्याच चेंडूवर सुझी बेट्सच्या रूपाने धक्का बसला.
मारिझान कापने तिला पायचीत पकडले. यानंतर काही प्रमाणात पुनरागमन करूनही न्यूझीलंडने ठरावीक अंतराने बळी गमावले. सोफी आणि ब्रूक हॅलिडे यांनी चौथ्या बळीसाठी ७५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. मलाबाने ३९व्या षटकात हॅलिडेला बाद करून ही जोडी फोडली. हॅलिडेने ३७ चेंडूंत ६ चौकारांसह ४५ धावांची आक्रमक खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : ४७.५ षटकांत सर्वबाद २३१ धावा (सोफी डीव्हाइन ८५, ब्रूक हॅलिडे ४५, जाॅर्जिया प्लिममेर ३१; नोनकुलुलेको मलाबा ४/४०.) पराभूत वि. दक्षिण
आफ्रिका : ४०.५ षटकांत ४ बाद २३२ धावा (ताझमिन ब्रिट्स १०१, सुन लूस नाबाद ८१; अमेलिया केर २/६२.)