दुबई - कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसी टीम रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर असणाºया भारतीय संघाला एकदिवसीय टीम रँकिंगमध्येदेखील टॉपवर पोहोचण्याची संधी असणार आहे; परंतु त्यासाठी त्यांना आता नंबर वन दक्षिण आफ्रिकेला दर्बन येथे १ फेब्रुवारीपासून सुरूहोणाºया ६ वनडे सामन्यांच्या मालिकेत मोठ्या अंतराने पराभूत करावे लागेल.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जर मालिकेत ४-२ अथवा यापेक्षा चांगल्या अंतराने जिंकला, तर ते अव्वल स्थानावर पोहोचतील. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला अव्वल स्थान राखण्यासाठी मालिका बरोबरीत सोडवावी लागणार आहे. तथापि, दक्षिण आफ्रिकेचा संघ ५-१ अंतराने जिंकल्यास भारत तिसºया स्थानावर असणाºया इंग्लंडपेक्षा दशांश गुणांनी मागे पडेल.
दक्षिण आफ्रिकेचे आता १२१, तर भारताचे ११९ गुण आहेत. ११६ गुणांसह इंग्लंड तिसºया स्थानावर आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वनडे खेळाडूंच्या रँकिंगमध्ये ८७६ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा अॅबी डिव्हिलियर्स (८७२) दुसºया क्रमांकावर आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (८२३), रोहित शर्मा (८१६) आणि पाकिस्तानचा बाबर आजम (८१३) यांचा क्रमांक लागतो.
महेंद्रसिंह धोनीची एका स्थानाने घसरण होऊन तो १३ व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानंतर शिखर धवनचा क्रमांक लागतो. गोलंदाजांत जसप्रीत बुमराह (७२८) हा अव्वल स्थानावर काबीज असलेल्या इम्रान ताहिर (७४३) आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट (७२९) यांच्यानंतर तिसºया क्रमांकावर आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल ६४३ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. आयसीसी वनडे अष्टपैलूंच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा अव्वल दहा जणांत समावेश नाही. या यादीत बांगलादेशचा शाकीब-अल-हसन अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर पाकिस्तानचा मोहंमद हाफीज आणि अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी यांचा क्रमांक लागतो. वनडे टीम रँकिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आॅस्ट्रेलियाची दोन स्थानांनी घसरण झाली असून, ते पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. इंग्लंडने आॅस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका ४-१ अशी जिंकली होती.