Join us  

बस कंडक्टर माऊलीचा मुलगा भारताच्या युवा क्रिकेट संघात

अथर्व अंकोलेकर : प्रतिकूल परिस्थितीतून आईच्या पाठिंब्यासह मिळवले यश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 2:32 AM

Open in App

मुंबई : तुमच्यामध्ये जर गुणवत्ता आणि अथक मेहनत घेण्याची तयारी असेल, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने हीच गोष्ट सिद्ध केली आहे. भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळवत अथर्वने सर्वांचेच लक्ष वेधताना प्रतिकूल परिस्थितीतूनही यश मिळवण्यासाठी सर्वांना नवा विश्वास दिला. श्रीलंकेत ५ सप्टेंबरपासून १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होईल.

डावखुरा फिरकीपटू असलेल्या अथर्वचे वडील विनोद अंकोलेकर बेस्टमध्ये कंडक्टर होते. २०१० साली अथर्वच्या वडिलांचे निधन झाले, पण अथर्वने हार मानली नाही आणि आता त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले आहे. वडिलांच्या निधनानंतर अथर्वला क्रिकेटसाठी आई वैदही अंकोलेकर यांनी प्रोत्साहन दिले. वैदही सध्या मरोळ बेस्ट आगारामध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. अथर्व फक्त क्रिकेट खेळत नसून त्याचे शिक्षणही सुरू आहे. मुंबईतील रिझवी महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. ‘अथर्वची जेव्हा भारतीय संघात निवड झाली, तेव्हा मला बरेच शुभेच्छांचे मेसेज आले. माझे पती विनोद हे बेस्टमध्ये कंडक्टर होते. त्यांचे निधन झाले आणि आमच्यावर मोठे संकट कोसळले. आमच्या घरामध्ये ते एकटेच कमावते होते. सुरुवातीच्या काही काळात मी मुलांच्या शिकवण्या घेतल्या. पण कालांतराने मला पतींच्या जागी बेस्टमध्ये नोकरी देण्यात आली,’ असे अथर्वच्या आई वैदेही यांनी सांगितले.

मी माझ्या वडिलांचे स्वप्न साकारतोय. आज मला त्यांची फार आठवण येत आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा बाबा माझ्या उशीजवळ बॅट आणून ठेवायचे. ज्या वेळी माझ्याकडून चांगली कामगिरी व्हायची, तेव्हा ते अन्य क्रिकेटचे साहित्य आणून ठेवायचे. या सर्व गोष्टींची आता मला आठवण येत आहे.- अथर्व अंकोलेकरवडिलांचे स्वप्न साकारल्याचे समाधानअथर्वचे वडील विनोद हे स्वत: उत्कृष्ट क्रिकेट खेळायचे. मात्र त्यांना क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यांचेहेच स्वप्न आज अथर्वने पूर्ण केले आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेल्या अथर्वने वयाच्या ९व्या वर्षी वडिलांचे छत्र गमावले. यानंतर आई वैदेही यांनी अथर्वला कायम प्रोत्साहन दिले. पार्ले टिळक विद्यालयात सुरेन अहिरे आणि नीलेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय क्रिकेट गाजवल्यानंतर पुढे अथर्वला एमआयजी क्लब येथे प्रशांत शेट्टी आणि दिवाकर शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेसाठी गेलेल्या अथर्वचे पुढील लक्ष्य टीम इंडियातील प्रवेश असले, तरी वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यात यश आले याचे अधिक समाधान त्याला आहे.आई वैदेही(बस कंटक्टर) 

टॅग्स :बसचालकभारतीय क्रिकेट संघमुंबई