एकीकडे भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएलची रणधुमाळी सुरू असतानाच देशांतर्गत क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबईचा युवा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याने मुंबईचा संघ सोडून गोव्याच्या संघाकडून खेळण्याचे निश्चित केल्याचे समोर आले होते. यशस्वी जयस्वाल याने यासंदर्भात मुंबई क्रिकेट संघटनेला पत्र लिहून विनंती केली होती. तसेच ही विनंती मुंबई क्रिकेट संघटनेने मान्य केली आहे. त्यामुळे आता यशस्वी जयस्वालचा गोव्याकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबरोबरच यशस्वी जयस्वालने मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय का घेतला याची माहितीही समोर आली आहे.
खरंतर यशस्वी जयस्वालकडे मुंबईच्या क्रिकेट संघाचं भविष्य आणि भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहिलं जात होतं. मात्र आता गोव्याच्या संघाकडून यशस्वीला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोव्याच्या संघाने हल्लीच रणजी क्रिकेटच्या प्लेट डिव्हिजनमधून एलिट डिव्हिजनमध्ये प्रवेश केलेला आहे. गोव्याकडून खेळण्याच्या निर्णयाबाबत यशस्वी जयस्वाल म्हणाला की, गोव्याने मला नवी संधी दिली आहे. त्यांनी मला संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. सध्यातरी भारतीय क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी करणं हे माझ्यासमोरील पहिलं लक्ष्य आहे. जेव्हा मी राष्ट्रीय संघात नसेन तेव्हा मी गोव्याकडून खेळेन, तसेच संघाला स्पर्धेत पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. यशस्वीने पुढे सांगितले की, आज मी जो काही आहे तो मुंबईच्या क्रिकेट संघामुळे आहे. या शहराने मला घडवलं आहे. आज मी जो काही आहे त्यासाठी मी मुंबई क्रिकेट संघटनेचा कायम ऋणी राहणार आहे.
दरम्यान, यशस्वी जयस्वालने मुंबईचा संघ सोडण्यामागची काही कारणंही आता समोर आली आहेत. त्यानुसार यशस्वी जयस्वाल हा मुंबईच्या संघाची रणनीती, खेळाडूंची निवड आणि बदलांबाबत समाधानी नव्हता,अशी माहिती समोर आली आहे. यशस्वी जयस्वाल आणि अजिंक्य रहाणे यांचेही संबंध फारसे चांगले नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये २०२२ पासूनच मतभेद होते, असा दावा केला जात आहे. त्यावेळी दुलिप ट्रॉफीच्या अंतिम लढतीत अजिंक्य रहाणे पश्चिम विभागाचं नेतृत्व करत होता. त्यावेळी रहाणाने शिस्तभंगाच्या कारणाखाली यशस्वी जयस्वाल याला मैदानाबाहेर पाठवले होते. त्यावेळी यशस्वी जयस्वाल दक्षिण विभागाचा फलंदाज रवी तेजा याला स्लेजिंग करून डिवचत होता. तेव्हा यशस्वी आपल्या मर्यादा ओलांडतोय, असं रहाणेला वाटलं होतं. तसेच त्याने यशस्वीला मैदानाबाहेर पाठवलं होतं. त्याशिवाय दोन वर्षांपूर्वी मुश्ताक अली करंडक स्पर्धेत यशस्वी मुंबईकडून खेळत असताना त्याच्या फटक्यांच्या निवडीवर खूप टीका झाली होती. त्यावेळीही आपल्याला संघ व्यवस्थापनाने चुकीच्या पद्धतीने लक्ष्ये केले, असं यशस्वीला वाटत होतं.
याशिवाय रणजी करंडक स्पर्धेत बीकेसी येथे मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यात झालेल्या लढतील मुंबईचा धक्कादायक पराभव झाला होता. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल संघात असतानाही झालेल्या या पराभवानंतर यशस्वी संघव्यवस्थापनाच्या निशाण्यावर आला होता. त्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक साळवी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी यशस्वीच्या कटिबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी यशस्वीने रागाच्या भरता रहाणेच्या किटबॅगवर लाथ मारली होती. आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात आहे, असं यशस्वीला वाटत होतं, त्यानंतर यशस्वीनं मुंबईचा संघ सोडण्याचं निश्चित केलं होतं.