Join us  

...म्हणून विराट कोहलीने विंडीज दौऱ्यातून विश्रांती घेणे टाळले

कर्णधार विराट कोहली आराम करणे टाळून वेस्ट इंडिज दौऱ्यात होणाऱ्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकांचे नेतृत्व करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 10:28 AM

Open in App

मुंबई - ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी झाली आहे. विशेष बाब म्हणजे कर्णधार विराट कोहली आराम करणे टाळून या दौऱ्यात होणाऱ्या टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकांचे नेतृत्व करणार आहे. खरंतर विश्वचषक स्पर्धेच्या मध्यावर विराट कोहली आगामी विंडीज दौऱ्यातून माघार घेणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र उपांत्य फेरीत अनपेक्षितरीत्या पराभव पत्करावा लागल्याने विराटला धक्का बसला असून, त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले होते. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आरामावर पाणी सोडून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणे विराटने पसंत केले आहे. भारतीय संघाने नुकत्याच आटोपलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे आपण विश्वचषक जिंकणार असे क्रिकेटप्रेमींसह विराटनेही गृहित धरले होते. त्यामुळेच विंडीज दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेमधून माघार घेण्याचा निर्णय त्याने घेतला होता. मात्र उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून अनपेक्षितरीत्या पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघ आणि विराट कोहलीच्या नेतृत्वावर चौफेर टीका होऊ लागली होती. अशा परिस्थितीत विराटने विंडीज दौऱ्यावर जाणे टाळले असते तर त्याच्यावर अधिकच टीका झाली असती. 

दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाला पर्याय म्हणून रोहित शर्माचे नाव वेगाने पुढे येत आहे.  विश्वचषकातील पराभवानंतर मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व रोहितकडे सोपवावे, अशी मागणीही होत होती. त्यातच विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने जेव्हा जेव्हा संघाचे नेतृत्व केले तेव्हा भारतीय संघाला यश मिळवून दिले होते. त्यामुळे अशा वेळी नेतृत्वाला ब्रेक देणे योद्य ठरणार नाही, असा विचार करून विराटने वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणे निश्चित केले. 

 वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ हा भारताच्या तुलनेने कमकुवत असला तरी बड्या संघांना दणका देण्याची क्षमता या संघामध्ये आहे. त्यामुळे या दौऱ्यात विजयी कामगिरी करण्याचे आव्हान भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीसमोर असेल.  

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ