लंडन : अंपायर इयान गोल्ड यांनी २०१० मध्ये भारतीय प्रेक्षकांच्या भीतीमुळे सचिन तेंडुलकरला मुद्दाम बाद दिले नव्हते, असा दावा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने केला आहे. सचिन त्यावेळी वन-डे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक द्विशतकाकडे वाटचाल करीत होता.
स्टेन म्हणाला,‘सचिन ज्यावेळी द्विशतकापासून १० धावा दूर होता त्यावेळी त्याने भारताच्या या स्टार फलंदाजाला पायचित बाद केले होते, पण मैदानावरील पंच गोल्ड यांनी सचिनला बाद दिले नाही.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसोबत स्काय स्पोर्ट््सच्या पॉडकास्टमध्ये स्टेन म्हणाला,‘तेंडुलकरने ग्वाल्हेरमध्ये आमच्याविरुद्ध वन-डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले. वन-डे क्रिकेट इतिहासातील हे पहिले द्विशतक होते. मला आठवते की ज्यावेळी तो १९० धावांच्या जवळजवळ होता त्यावेळी मी त्याला बाद केले होते. इयान गोल्ड अंपायर होते. त्यांनी त्याला नाबाद दिले होते.’
स्टेन म्हणाला,‘मी त्यांना विचारले की त्याला बाद का दिले नाही. तो बाद होता.
ते म्हणाले, तू चारही बाजूला बघ. जर मी त्याला बाद दिले तर मला हॉटेलमध्ये जाता येणार नाही.’
तेंडुलकरने अखेर नाबाद २०० धावांची खेळी करताना वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले.
भारताने सचिनच्या खेळीच्या जोरावर द्विपक्षीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ३ बाद ४०३ धावांची दमदार मजल मारली होती. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणाºया दक्षिण आफ्रिकेचा डाव ४२.५ षटकांत २४८ धावात गुंडाळत १५३ धावांनी विजय साकारला होता.(वृत्तसंस्था)