Join us  

India vs West Indies :...म्हणून टीम इंडियाला धावांचा पाठलाग करणे आवडते, रोहितने सांगितले गुपित 

आव्हानाचा पाठलाग करणे भारतीय संघाला का आवडते याचे कारण भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने उघड केले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:19 AM

Open in App

मुंबई - सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. प्रथम फलंदाजी करत फटकावलेल्या 170 धावांचा बचाव करणे भारतीय संघाला शक्य झाले नव्हते. मात्र समोर कितीही मोठे आव्हान असले तरी भारतीय फलंदाज त्या आव्हानाचा सहजपणे पाठलाग करतात, असे गेल्या काही काळात दिसून आले आहे. दरम्यान, आव्हानाचा पाठलाग करणे भारतीय संघाला का आवडते याचे कारण भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने उघड केले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा आणि निर्णायण टी-20 सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित म्हणाला की, ''जेव्हा तुम्ही आव्हानाचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे हे अचूक माहिती असते. मग आव्हान 200 धावांचे असो वा 150 धावांचे कोणत्या धावगतीने फलंदाजी करायची हे तुम्हाला ठावूक असते. तसेच एका षटकात किती धावा वसूल करायचा याचेही गणित निश्चित झालेले असते. मात्र जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करता तेव्हा तुम्ही एक मोठे आव्हान उभे करण्यास इच्छुक असता.'' 

  ''प्रथम फलंदाजी करताना तुम्ही सेट फलंदाज आहात आणि तुम्हाला लवकर बाद व्हायचे नाही आहे हे एकाच वेळी ध्यानात ठेवावे लागते.'' असेही रोहितने सांगितले. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शेवटच्या 10 षटकांत केवळ 77 धावा जमवता आल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते. नंतर वेस्ट इंडिजने भारताने दिलेल्या आव्हानाचा सहजपणे पाठलाग केला होता. 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ