जयपूर, आयपीएल 2019 : महिलांच्या आयपीएलचा पहिला सामना चांगलाच रंगतदार झाला. या अटीतटीच्या सामन्यात अखेर स्मृती मानधनाच्या ट्रेलब्रेझर संघाने सुपरनोव्हासवर फक्त दोन धावांनी विजय मिळवला. स्मृतीच्या 90 धावांच्या खेळीच्या जोरावर ट्रेलब्रेझर संघाने सुपरनोव्हासपुढे 141 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सुपरनोव्हासची कर्णधर हरमनप्रीत कौरने नाबाद 46 धावांची खेळी साकारली, पण त्यांना विजय मात्र मिळवता आला नाही. स्मृतीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
![]()
महिला ट्वेंटी-20 सामन्याच्या पहिल्याच सामन्यात स्मृती आणि हार्लिन देओल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी रचली आणि संघाला सन्मानजक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. स्मृतीने यावेळी 67 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 90 धावांची धडाकोबाज खेळी साकारली. सामन्यानंतर या खेळीबद्दल विचारले असता या सामन्यात खून्नस म्हणून खेळल्याचे स्मृतीने सांगितले. सामन्यानंतर सुपरनोव्हास संघाच्या जेमिमा रॉड्रीग्जने स्मृतीची मुलाखत घेतली. त्यावर तिने हा खुलासा केला.
![]()
ती म्हणाली,''या सामन्यात पूर्ण खून्नसमध्येच खेळणार हे ठरवले होते. कारण, प्रतिस्पर्धी संघात तू ( जेमिमा रॉड्रीग्स) होतीस. याची कल्पना मी तुला सामन्याच्या आदल्या दिवशीच दिली होती.'' अर्थात ही खून्नस हा त्यांच्या मस्करीचा भाग होता. स्मृती आणि जेमिमा या खास मैत्रीणी आहेत. भारतीय महिला संघाच्या सलामीची जबाबदारी या दोघींनी गेल्या वर्षभरात सक्षमपणे पार पाडली आहे. खेळीमेळीत रंगलेल्या या गप्पांत स्मृती आणि जेमिमा यांनी धम्माल मस्ती केली.
![]()
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/188216?tab=scorecard#