Join us  

स्मिथला रोखले, आता रुट रडारवर; भारतीय गोलंदाज इंग्लंडविरुद्ध रणनीती आखण्यात व्यस्त

२०१९ला ट्रेंट बोल्टविरुद्ध स्टीव्ह स्मिथ याने अनेक अडथळ्यांना तोंड दिले होते, ही गोष्ट माझ्या डोक्यात होतीच.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 7:03 AM

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्टीव्ह स्मिथला धावा काढण्यापासून वंचित ठेवणारी रणनीती यशस्वी ठरल्यानंतर भारतीय संघाचे गोलंदाजी कोच भरत अरुण इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेत ज्यो रुट या दिग्गज फलंदाजाला धावा काढू द्यायच्या नाहीत, हे लक्ष्य आखून कामाला लागले आहेत. श्रीलंकेविरुद्ध दमदार फलंदाजीची झलक दाखविणाऱ्या रुटला घरच्या मैदानावर कुठल्याही स्थितीत धावा काढण्यात यश येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे काम अरुण यांच्याकडे आहे. 

रुटने लंकेविरुद्ध चार डावांमध्ये ४२६ धावा काढल्या असून त्यात एका द्विशतकाचाही समावेश होता. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात स्मिथसाठी खास डावपेच आखले होते. सर्वच डावपेच यशस्वी ठरले. यावेळी रुटवर नियंत्रण मिळविण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. मागच्या वर्षी जुलैमध्ये अरुण यांना कोच रवी शास्त्री यांनी फोन केला. त्यावेळी कोरोना महामारीत वेस्ट इंडिज संघ इंग्लंडमध्ये मालिका खेळत होता. भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जावे लागेल, याचे संकेत मिळाल्याने शास्त्री यांनी अरुण यांना सावध केले होते. याविषयी अरुण म्हणाले, आमच्यात लांबलचक चर्चा झाली. ते मला म्हणाले, ऑस्ट्रेलियात चेंडू ऑफस्टम्प बाहेर ठेवावा लागेल. 

तुम्ही गोलंदाजांसाठी योजना आणि क्षेत्ररक्षणाचा प्लान तयार करावा. जितक्या धावा रोखता येतील त्या रोखाव्यात, अशी आमची योजना होती. याची सुरुवात स्टीव्ह स्मिथला ‘टार्गेट’ करून व्हावी. जगातील आणि ऑस्ट्रेलिया संघातील तो सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, असे शास्त्री यांचे मत होते. स्मिथने मालिकेत ३१३ धावा केल्या, त्यातील १३१ धावांची एक खेळी होती. अन्य सात डावांमध्ये त्याने १८२ धावांचे योगदान दिले.

२०१९ला ट्रेंट बोल्टविरुद्ध स्टीव्ह स्मिथ याने अनेक अडथळ्यांना तोंड दिले होते, ही गोष्ट माझ्या डोक्यात होतीच. मी स्मिथचा फलंदाजी ग्राफ आणि इतिहास तपासला. कोणत्या क्षेत्रात त्याने किती धावा खेचल्या हे तपासले. तो ऑनसाइडला खेळत असेल तर चेंडू कुठे जातो, हे पाहिल्यानंतर त्यानुसार रणनीती आखली. फलंदाजी ग्राफवरून एक बाब पुढे आली ती ही की स्मिथ ७० टक्के शॉट ऑफ साइडला खेळतो. त्याला रोखल्यास ऑनसाइडला फटके मारण्यास तो बाध्य होईल, शिवाय फटका मारताना नियंत्रण राखणे त्याच्यासाठी कठीण होईल. आमच्या योजनेनुसार गोलंदाजांनी त्याच्यावर नियंत्रण मिळविलेच. स्मिथने मालिकेत शतक ठोकले खरे, मात्र त्यासाठी त्याला २००हून अधिक चेंडूंचा सामना करावा लागला हे विशेष.

‘रुट फॉर्ममध्ये असल्यामुळे इंग्लंडसाठी ही जमेची बाब ठरू शकते. ही मालिका रोमहर्षक होईल, यात शंका नाही. आम्ही घरच्या मैदानावर खेळणार असून ऑस्ट्रेलियातील विजयामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले आहे. रुट फॉर्ममध्ये असल्यामुळे इंग्लंडसाठी ही जमेची बाब ठरू शकते. ही मालिका रोमहर्षक होईल, यात शंका नाही. आम्ही घरच्या मैदानावर खेळणार असून, ऑस्ट्रेलियातील विजयामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले आहे. - भरत अरुण, गोलंदाजी प्रशिक्षक

 

टॅग्स :भारतइंग्लंड