सिडनी: आयपीएलमध्ये चांगल्या कामगिरीच्या जोरावर पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषकाआधी फॉर्ममध्ये परतण्याचा निर्धार आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने व्यक्त केला. २९ वर्षीय स्मिथ राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे.
स्मिथ व त्याचा सहकारी डेव्हिड वॉर्नर यांना द. आफ्रिकेविरुद्ध चेंडू कुरतडल्याप्रकरणी वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते. आयपीएलआधी हे निलंबन संपणार आहे. द. आफ्रिकेतून परतल्यानंतर स्मिथ पत्रकार परिषदेत रडला होता. तेव्हापासून शुक्रवारी तो पहिल्यांदा पत्रकारांपुुढे आला. तो म्हणाला, ‘सध्या एकदिवसीय क्रिकेटचे स्वरूप पाहिले की टी२० मोठा प्रकार वाटतो. त्यामुळेच आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेद्वारे मी पुनरागमन करू इच्छितो.’
स्मिथने बंदीदरम्यान अनेक टी२० सामन्यात भाग घेतला. तो कॅनडा व कॅरेबियन देशातही खेळला. आयपीएल मार्चच्या अखेरीस होणार असून विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये ३० मे पासून होईल.
स्मिथ म्हणाला, ‘मला बांगलादेशमध्ये लीग खेळायची होती पण नियम माहिती नव्हते. पाकिस्तान लीग व आयपीएलही खेळायचे आहे. संघात खेळण्याची संधी मिळाल्यास विश्वचषकाची योग्य तयारी होईल.’
बंदी लागल्यापासून नऊ महिन्यांचा वेळ किती कठीण गेला, असे विचारताच तो म्हणाला, ‘हा काळ भावना आणि संयम यांची कसोटी घेणारा होता. पण अशा गोष्टींवर मात करणे मी आता शिकलो आहे. अनेक चढ-उतार माझ्या कारकिर्दीमध्ये आले. त्यामुळे मी बराच वेळ एकांतात घालवू इच्छित होतो, पण माझ्या सभोवतालच्या लोकांनी आधार दिल्यामुळे स्वत:ला सावरू शकलो.’ (वृत्तसंस्था)